पंढरपूर, 22 जुलै : दुधाला दरवाढ मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्यभरात आंदोलन पुकारले आहे. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर दुधाची नासाडी केल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. पण, पंढरपूरमधल्या एका चिमुरड्याचा दुधाने अंघोळ करत असताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
'आम्ही कायबी करीन, आमचं दूध आहे, दुधाने आंघोळ करीन नाहीतर जनावरांना घालीन पण दुधाला दर मिळाल्याशिवाय डेअरीमध्ये दूध घालणार नाही' असं म्हणत पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील शेतकऱ्याच्या मुलाने दुधाने अंघोळ केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
‘आम्ही कायबी करीन, दुधाने अंघोळ करीन नाहीतर जनावरांना घालीन पण दुधाला दर मिळाल्याशिवाय डेअरीमध्ये दूध घालणार नाही‘ pic.twitter.com/O3T6bwiHNh
चक्क बादलीत दूध घेऊन या चिमुरड्याने दुधाने अंघोळ केली आहे. दुधाला दर जोपर्यंत मिळणार नाही, तोपर्यंत दूध डेअरीला देणार नाही, असंही हा चिमुरडा ठामपणे सांगत आहे.
दरम्यान, दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी किमान 30 रुपये प्रति लिटर भाव द्या, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी बोलावलेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.
दुधाला 30 रुपये दर मिळावा यासाठी सरकारने प्रति लिटर 10 रुपये अनुदान सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावे व राज्यातील गोदामांमध्ये पडून असलेल्या दूध पावडरचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी दूध पावडरला 50 रुपये निर्यात अनुदान द्यावे अशी मागणी बैठकीत किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली.
बहुतांश शेतकरी नेत्यांनी आणि दूध संघांच्या प्रतिनिधींनीही याच प्रकारची मांडणी केली. मात्र, मंगळवारी झालेली ही बैठक प्राथमिक असल्याने आपण केवळ शेतकरी संघटना व दूध संघांच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतले, या आधारे मंत्रिमंडळात चर्चा करून निर्णय घेऊ, अशी भूमिका दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी मांडली.