नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : आपण दैनंदिन जीवनात आपल्या आसपास अनेक गोष्टी पाहत असतो. लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. भिकारी तर जगण्यासाठी किती अडचणींचा सामना करत असतील. त्यांना दिवभरात काय काय अडचणी येतात आणि कोणत्या गोष्टींना समोरे जावे लागते हे अनुभवण्यासाठी चक्क एक प्रसिद्ध युट्यूबर 24 तासांसाठी भिकारी बनला आहे. त्याने याचा व्हिडीओ यूट्यूबर शेअर केला असून सध्या व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. प्रसिद्ध युट्यूबर रोहित साधवानी 24 तासांसाठी भिकारी बनला आहे. यावेळी त्याने सोबत फक्त पाण्याची बाटली घेतली. सर्वात पहिले तो मंदिरासमोर जाऊन बसला. मंदिराबाहेर भीक मागून त्याला फक्त 5 रुपये मिळाले. मग त्याने काही लोकांकडे अन्न मागायला सुरुवात केली. अनेकांनी त्याला खायला देण्यास नकार दिला. तर एका भाजी विक्रेत्याने त्याला गाजर दिले आणि फळ विक्रेत्याने त्याला केळ दिले. यावेळी रोहितला अनेक गोष्टींचा अनुभव आल्याचं त्यानं सांगितलं.
रोहितने सांगितलं की, भिकारी होणं खरोखरंच खूप अवघड आहे. त्याला काही मानसिक रोग असलेले लोकही सापडले. एक माणूस एकांतात बडबडत होता. यादरम्यान रोहितला डोकेदुखीचाही त्रास सुरु झाला. अनेक तास काहीच न करता बसल्यामुळे माणूस निष्क्रिय विचारात गुंतुन जातो. लोक अन्न जास्त प्रमाणात देतात पैसे क्वचितच लोक देतात.
रोहितला 24 तासांत फक्त 20 रुपये मिळाले. अनवानी चालल्यामुळे त्याच्या पायालाही फोड आले. त्याला पाहून लोक त्याच्यापासून दूरही पळत होते. रोहितचा हा व्हिडीओ त्याच्या मित्रांनी शूट केला. व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला असून व्हिडीओवर खूप कमेंटदेखील येत आहे.