इंग्लड, 18 एप्रिल: एखाद्या प्राण्याला सुखरुपपणे ये-जा करता यावी यासाठी पूर्ण वाहतूक बंद करण्यात येते, असे तुम्ही कधी ऐकले आहे का? हो हे खरं आहे. रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडताना अनेकदा वाहनांची धडक बसून प्राण्यांना अपघात होतो आणि त्यांना प्रसंगी आपला जीव गमवावा लागतो. यावर अनेकदा उपाययोजना करण्यात येतात. परंतु त्या तितक्याशा प्रभावी ठरतातच असे नाही. ही बाब लक्षात घेऊन युरोपातील एस्टोनियात (Estonia) बेडकांच्या (Frogs) प्रजनन काळात तेथील एका रस्त्यावरील कार वाहतूक एप्रिल महिन्यात रात्रीच्या वेळी बंद करण्यात येते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेडकांना त्यांच्या प्रजनन स्थळी (breeding grounds) सुखरुप पोहोचता यावे, यासाठी एप्रिल महिन्यात रात्रीच्या वेळी एस्टोनियाची राजधानी टॉलनीनमधील रस्ते कार वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येतात.
स्वयंसेवक सहसा वसंत ऋतूमध्ये बेडकांना त्यांच्या प्रजननस्थळी सुखरुप पोचण्यासाठी मदत करतात. या स्वयंसेवकांनी मागील वर्षी 97,000 हजार बेडकांचे प्राण वाचवले होते. त्यात टॉलनीन (Tallinn) रोडवरील 2000 बेडकांचा समावेश होता. परंतु यंदा कोरोना महामारी स्वयंसेवकांना अशा प्रकारे मदत करणे अशक्य झाल्याने या उभयचर प्राण्यांसाठी रस्ता बंद करणे हा एक पर्याय होता.
वाचा: 'मी मरेन पण कुत्र्याला मरू देणार नाही!'; कोरोनाच्या संकटात भूतदया दाखविणारा VIDEO
याबाबत एस्टोनियन नॅशनल फंडाचे स्वयंसेवक क्रिस्टल सॅर्म म्हणाले की, रस्ता होण्याआधीपासून या भागात बेडूक येत होते. आता ते ज्या तलावांमध्ये पैदास करतात ते रस्त्याच्या एका बाजूला आणि त्यांचे हिवाळ्याचे ठिकाण दुसऱ्या बाजूला आहे. त्यामुळे त्यांना रस्ता ओलांडणे भाग पडते. रस्त्याच्या उबदार पृष्ठभाग यामुळे उभयचर झोपाळू होतात आणि त्यांचा चालण्याचा वेगही कमी होतो. त्यामुळे एकावेळी एकाच ठिकाणी 300 पेक्षा बेडूक अडकून राहू शकतात. अशावेळी रस्त्यावर कार वाहतूक सुरु असेल तर त्यांच्या जिविताला धोका निर्माण होतो, असे सॅर्म यांनी सांगितले.
याबाबत हबर्स्ती जिल्ह्याचे उपप्रमुख ओलेग सिलजानोव्ह यांनी सांगितले की, बेडकांना रस्ता सहजतेने ओलांडता यावा यासाठी रस्त्याच्या खाली बोगदा बनविण्याचा विचार आहे. तसेच बेडूक ज्या ठिकाणी हिवाळयात राहतात त्याच ठिकाणी तलाव (Pond) बांधण्याचाही प्रयत्न आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral