लखनऊ, 30 जानेवारी : विवाह सोहळ्यादरम्यान काही विचित्र घटना घडल्याचं आपण बऱ्याचदा ऐकतो, वाचतो. सध्या उत्तर प्रदेशातला एक विवाहसोहळा अशाच एका विचित्र घटनेमुळे जोरदार चर्चेत आला. नवरदेवावर केलेल्या एका आरोपामुळे एकच खळबळ उडाली. विवाहाचे सर्व विधी थांबवण्यात आले. नंतर या सोहळ्यात वधूचा विवाह त्या व्यक्तीच्या लहान भावाशी लावण्यात आला. या फिल्मी स्टाइल प्रसंगामुळे हा विवाहसोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरला. या युवकाच्या धाकट्या भावाच्या विवाहसोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
संबळ येथे दुसरा विवाह करण्यासाठी आलेल्या युवकाच्या नियोजित वधूचा त्याच्या धाकट्या भावाशी विवाह झाल्याची अनोखी घटना समोर आली आहे. असमोली पोलीस स्टेशन हद्दीतल्या दवोई खुर्द गावात हा प्रकार घडला. गेल्या बुधवारी अमरोहा जिल्ह्यातल्या सैद नागली पोलीस स्टेशन हद्दीतल्या भदौरा गावातला एक युवक लग्नाची वरात घेऊन दवोई खुर्द येथे पोहोचला. वरात विवाहस्थळी पोहोचताच वधू पक्षाच्या मंडळींनी वराचं जोरदार स्वागत केलं. त्यानंतर लग्नाची तयारी जोरात सुरू होती. त्या वेळी एक महिला तीन वर्षांच्या मुलासह विवाहस्थळी दाखल झाली. तो युवक आपला पती असल्याचं सांगून या महिलेनं गोंधळ घालण्यास सुरूवात केली. `या व्यक्तीचा पाच वर्षांपूर्वी माझ्याशी विवाह झाला असून आम्हाला तीन वर्षांचा मुलगा आहे. ही व्यक्ती माझी फसवणूक करून दुसरा विवाह करत आहे,` असं या महिलेनं वधूचे कुटुंबीय आणि नातेवाइकांना सांगितलं.
VIDEO - अरे हिला आवरा! नवरीबाई जोशात असं काही करू लागली नवरदेवही लाजला; सर्वांना हाका मारू लागला
सुरुवातीला वधूच्या नातेवाईकांनी या महिलेच्या गोंधळाकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर या महिलेने पोलिसांना फोन केला. महिलेच्या तक्रारीवरून पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहताच युवक घाबरला आणि त्याने त्याचा विचार बदलला. `मी माझ्या नाही, तर धाकट्या भावाच्या विवाहासाठी वरात घेऊन आलो आहे,` असं त्यानं सांगितलं. युवकाचं म्हणणं ऐकताच वधूचे कुटुंबीय आणि नातेवाइकांना जबर धक्का बसला. त्यानंतर दोन्ही पक्षांनी आपापसात चर्चा केली आणि युवकाच्या धाकट्या भावाशी वधूचा विवाह लावून देण्यात आला. या विवाहसोहळ्याची परिसरात जोरदार चर्चा होती. महिलेच्या गोंधळामुळे वधूची संभाव्य फसवणूक टळली. या सोहळ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marriage, Uttar pardesh, Viral