रायपूर, 10 नोव्हेंबर : आपल्याला आरोग्याची किरकोळ समस्या झाली की आपण आधी आपल्या स्थानिक क्लिनिकमध्ये आणि गंभीर समस्या असेल तर रुग्णालयात जातो. तिथं डॉक्टर काही वैद्यकीय तपासण्या करतात आणि त्यानुसार उपचार करतात. प्रत्येक आजारांवरील उपचार हे ठरलेले असतात पण प्रत्येक डॉक्टरांची रुग्णांसोबत वागण्याची आणि त्यांच्यावर उपचार करण्याची पद्धत वेगळी असते. पण सध्या अशा डॉक्टरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, ज्याची उपचाराची पद्धत पाहूनच सर्वजण हादरले आहेत.
छत्तीसगढच्या कोरबातील जिल्हा रुग्णालयातील ही धक्कादायक घटना आहे. जिथल्या एका डॉक्टराने महिला रुग्णावर ज्या पद्धतीने उपचार केले ती पद्धत खूपच भयानक आहे. तिथंच असलेल्या एका व्यक्तीने डॉक्टरने महिला रुग्णासोबत उपचाराच्या नावाने केलेलं भयंकर कृत्य आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केलं आणि ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
हे वाचा - शुद्ध म्हणून या अशा बाटल्यांमधील पाणी बिनधास्त पित आहात; तर हा VIDEO एकदा पाहाच
गेरवानी गावातील सुखमती नावाची ही महिला रुग्ण. तिचा ब्लड प्रेशर लो झाला होता. बीपीवर उपचार करायला तिच्या नातेवाईकांनी तिला जिल्हा रुग्णालयात आणलं. रात्री रुग्णालयात आपत्कालीन उपचारासाठी सेवेत असलेले डॉक्टर, ज्यांनी या महिलेवर कशा पद्धतीने उपचार केला हे तुम्हीच व्हिडीओत पाहा.
व्हिडीओत पाहू शकता तर महिलेला बेडवर झोपवलं आहे आणि डॉक्टर तिच्याजवळ उभे आहेत. ते तिच्या कानाखाली मारताना दिसत आहेत. तिला मारहाण करत आहेत, तिचे केसही उपटत आहेत. उपचार करण्याऐवजी डॉक्टरांनी रुग्णाला मारहाण केली. तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना रोखण्याचा प्रयत्न केला पण डॉक्टरांनी कुणाचंच ऐकलं नाही. माहितीनुसार हा डॉक्टर नशेत होता.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनापर्यंत या घटनेची माहिती पोहोचली. या रुग्णालयाचे डीन डॉ. अविनाश मेश्राम यांनी सांगितलं की, या प्रकरणाचा तपास केला जातो आहे. संबंधित डॉक्टरला कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chattisgarh, Viral, Viral videos