जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 'ताजमहाल माझी प्रॉपर्टी', कोण आहे असा दावा करणारी राजकुमारी

'ताजमहाल माझी प्रॉपर्टी', कोण आहे असा दावा करणारी राजकुमारी

'ताजमहाल माझी प्रॉपर्टी', कोण आहे असा दावा करणारी राजकुमारी

ताजमहाल (Taj Mahal) आपल्या मालकीचा असल्याचा दावा करणाऱ्या राजकुमारी दिया कुमारी (Diya Kumari) गेल्या दोन दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आहेत.

    नवी दिल्ली, 12 मे : आग्र्याीतील जागतिक वारसा असलेल्या ताजमहालाशी संबंधित प्रकरण सध्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात आहे. त्यावर आज 12 मे रोजी सुनावणी होणार आहे. भाजपा नेते डॉ. रजनीश सिंह यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी म्हटलंय की, ताजमहालामध्ये (Taj Mahal) हिंदू देवदेवतांची शिल्पे आणि शिलालेख असू शकतात. जे त्याच्या मंदिर असल्याच्या दाव्यावर प्रकाश टाकू शकतात, त्यामुळे त्याचा तपास व्हायला हवा. तसंच ताजमहालामध्ये 22 खोल्या असून त्या बऱ्याच काळापासून बंद आहेत. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) त्या खोल्या उघडून त्यांचे सर्वेक्षण करावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे. अशातच ताजमहाल आणि ती जमीन आपल्या मालकीची असल्याचा दावा एका राजकुमारीने केलाय. ताजमहाल आपल्या मालकीचा असल्याचा दावा करणाऱ्या राजकुमारी दिया कुमारी (Diya Kumari) गेल्या दोन दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आहेत. आत्तापर्यंत काहींनी ताजमहाल हा ‘तेजोमहालय महादेव मंदिर’ आहे असा दावा केला होता, तो महाल आपल्या राजघराण्याच्या मालकीचा असल्याचा दावा राजकुमारी आणि भाजप खासदार दिया कुमारी यांनी केलाय. जयपूरच्या (Jaipur) राजघराण्याशी संबंधित असणाऱ्या राजकुमारी दिया कुमारी यांनी ताजमहाल हा पूर्वी आपल्या कुटुंबाचा राजवाडा होता, असं म्हणत त्याची कागदपत्रं अजूनही आपल्याकडे असल्याचं म्हटलंय. या संदर्भात आज तकने वृत्त दिलंय. दिया कुमारी यांचा दावा काय? राजकुमारी दिया कुमारींनी म्हटलंय, ‘ताजमहाल हा जयपूरच्या पूर्वीच्या राजघराण्याचा महाल होता, जो शाहजहानने ताब्यात घेतला होता. त्यावेळी देशावर मुघलांचं राज्य होतं, त्यामुळे राजघराण्याला फारसा विरोध करता आला नाही. आपल्या ट्रस्टमध्ये पोथीखाना म्हणजे दफ्तर असून, तिथे ताजमहालासंबंधी सर्व कागदपत्रं ठेवली आहेत, गरज पडल्यास आणि कोर्टाने तसा आदेश दिल्यास आपण ती सादर करायलाही तयार आहोत,’ असंही राजकुमारींचं म्हणणं आहे. कोण आहेत दिया कुमारी? दिया कुमारी या जयपूरच्या राजघराण्यातील आहेत. मुघल सम्राट अकबराच्या नवरत्नांमध्ये समाविष्ट असलेले मानसिंग यांच्या घराण्यातील त्या वारसदार आहेत. याच घराण्याला आधी आमेर आणि नंतर जयपूर घराणं म्हणून ओळखलं जाऊ लागलं. याच कुटुंबात महाराज सवाई भवानी सिंह यांचा जन्म झाला होता, त्यांच्या पत्नीचे नाव पद्मिनी देवी आहे. जयपूरचं राजघराणं आपण भगवान रामाचे वंशज असल्याचं सांगतं. जयपूरचे माजी महाराज भवानी सिंह हे भगवान रामाचे पुत्र कुश यांचे 309 वे वंशज होते, असा त्यांचा दावा होता. महाराजा सवाई भवानी सिंह हे 24 जून 1970 ते 28 डिसेंबर 1971 पर्यंत जयपूरचे महाराज होते. दिया कुमारी या भवानी सिंह आणि पद्मिनी देवी यांचं एकुलतं एक अपत्य आहेत. दिया कुमारींनी आपल सुरुवातीचं शिक्षण दिल्ली आणि जयपूर येथे पूर्ण केलं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्या लंडनला गेल्या. सामान्य नागरिकाशी लग्न केल्याने चर्चेत दिया कुमारींनी 1997 मध्ये नरेंद्र सिंह यांच्याशी गुपचूप लग्न केलं होतं. महाराजा सवाई मानसिंग II म्युझियममध्ये दोघांची भेट झाली. पदवीनंतर नरेंद्र म्युझियम ट्रस्टमध्ये प्रशिक्षणासाठी आले होते. त्यानंतर दोघांनी लग्न केलं होतं. नरेंद्र सिंह यांचा राजघराण्याशी कोणताही संबंध नव्हता, त्यामुळे राजकन्येचा अशाप्रकारे एका सामान्य नागरिकाशी झालेला विवाह तेव्हा चर्चेचा विषय ठरला होता. दोघांनी कोर्ट मॅरेज केलं होतं आणि दिया कुमारी यांच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. 21 वर्षांनी घटस्फोट - दरम्यान, सुरुवातीची अनेक वर्षं दोघांचं नातं चांगलं होतं, मात्र अचानक एकेदिवशी दोघांच्या घटस्फोटाची बातमी समोर आली. लग्नानंतर 21 वर्षांनी 2018 मध्ये दोघांनी परस्परसंमतीने घटस्फोट (Divorce) घेतला. घटस्फोटाचं कारण दोघांमधील मतभेद असल्याचं म्हटलं जातं. दोघंही पाच वर्षं एकमेकांपासून वेगळे राहिले, त्यानंतर दोघं पुन्हा सोबत राहू लागले आणि अखेर त्यांनी घटस्फोट घेतला. दिया आणि नरेंद्र यांना तीन मुलं आहेत. यामध्ये मोठा मुलगा पद्मनाभ आणि धाकटा मुलगा लक्ष्यराज सिंह यांचा समावेश आहे. त्यांना एक मुलगी देखील आहे, तिचं नाव गौरवी आहे. दियाचे वडील महाराज भवानी सिंह यांचं 2011 मध्ये निधन झालं. भवानी सिंह यांना मुलगा नव्हता, त्यामुळे दिया कुमारीच्या मुलालाच 2011 मध्ये त्यांचा वारसदार म्हणून घोषित करण्यात आला आणि त्यानंतर पद्मनाभ सिंहचा भवानी सिंह यांच्या गादीचा वारस म्हणून राज्याभिषेक करण्यात आला होता.

    हे वाचा -  ‘झोपाळू’ गावामुळे संशोधकही अचंबित; येथे चालता-चालता झोपतात लोक; कारण…

    दिया कुमारींचा राजकारणातील प्रवास - दिया कुमारी यांची आजी राजमाता गायत्री देवी (Gayatri Devi) यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी राजकारणात प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या दिया कुमारी पहिल्यांदा सवाई माधोपूरमधून आमदार झाल्या. त्यानंतर सध्या त्या राजसमंदमधून लोकसभेच्या खासदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत दिया कुमारी 5,519,16 मतांनी विजयी झाल्या होत्या. दरम्यान, दिया कुमारी यांनी ताजमहालाबद्दल केलेल्या दाव्यात किती तथ्य आहे, हे येत्या काळातच कळेल. तूर्तास तरी त्यांच्या दाव्यानं खळबळ उडाली आहे, एवढं मात्र नक्की.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात