नवी दिल्ली, 4 मे : एखादी व्यक्ती अचानक एखाद्या दुर्घटनेमुळे किंवा अन्य काही कारणामुळे मरण पावलेली असते. त्या व्यक्तीच्या आप्तेष्टांना खूपच धक्का बसलेला असतो. त्यांचं दुःख अनावर झालेलं असतं. खूप रडारड सुरू असते. बाकीची मंडळी त्यांचं सांत्वन करत असतात. तेवढ्यात अचानक ती मृत व्यक्ती उठून बसते. त्यामुळे सारंच चित्र पालटतं. दुःखाची जागा भीती किंवा आश्चर्य घेते. त्यानंतर खरंच ती व्यक्ती जिवंत झाल्याचं कळल्यावर सर्वांनाच आनंद होतो. असा प्रसंग अनेक चित्रपटांत आपण पाहिला असेल; पण अशा गोष्टी केवळ चित्रपटातच घडतात असं नव्हे. अलीकडेच पेरू देशात अशीच एक घटना घडली. त्यामुळे उपस्थितांना आधी भीती वाटली आणि मग आनंद झाला. मिरर वेबसाइटच्या हवाल्याने ‘टीव्ही नाइन हिंदी’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. नेमकं काय झालं? पेरू (Peru) देशातली रोझा इसाबेल (Rosa Isabel) नावाची एक महिला आपल्या कुटुंबीयांसोबत कारने प्रवास करत होती. त्यांच्या कारचा मोठा (Car Accident) अपघात झाला. त्यामुळे रोझा यांच्यासह तीन जण खूपच गंभीर जखमी झाले. त्यानंतर डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टरनी रोझा यांच्यासह अन्य एका व्यक्तीला मृत घोषित केलं. साहजिकच त्यामुळे सर्वांना दुःख झालं. अखेर 26 एप्रिल रोजी त्यांच्या दफनविधीची तयारी सुरू होती. सारे कुटुंबीय रडत होते. शोक व्यक्त करत होते. बाकीची मंडळी त्यांचं सांत्वन करत होती. तेव्हाच एक आक्रीत घडलं. त्यावर सुरुवातीला कोणाचाच विश्वास बसला नाही. रोझा यांना ज्या कॉफिनमध्ये (Coffin) ठेवण्यात आलं होतं, त्या कॉफिनवर आतून टकटक केल्याचा आवाज आला. नेमका कशाचा आवाज असेल, याचा अंदाज सर्व जण घेऊ लागले. अखेर, दफनभूमीच्या केअरटेकरने सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी कॉफिनचं दार (Dead Woman Alive) उघडलं. तेव्हा त्याचा स्वतःच्याच डोळ्यांवर विश्वास बसला नाही. आतमध्ये रोझा यांचा मृतदेह नव्हता, तर रोझा जिवंत होत्या. त्या जिवंत आहेत, हे कळल्यानंतर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यांना तेथे जीवरक्षक प्रणालीवर (Life Support System) ठेवण्यात आलं. कुटुंबीयांचा असा अंदाज आहे, की अपघातानंतर त्या कोमामध्ये गेल्या असाव्यात. तपासणीच्या वेळी डॉक्टर्सनी त्यांना मृत घोषित केलं.
हे वाचा - कुटुंबाने घरात पाळला भलामोठा कोळी; वर्षभरानंतर… पाहूनच सर्वांना फुटला घाम
दरम्यान, पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अर्थात, रोझा जिवंत आहेत, ही बातमी त्यांच्या घरच्यांना सुखावणारी आहे. त्यांचं दैव बलवत्तर होतं, असं म्हणावं लागेल. कारण एक तर त्या भीषण अपघातातून वाचल्या आणि नंतर जिवंतपणी दफन होता होता वाचल्या. त्यांना टकटक करण्यासाठी थोडा जरी उशीर झाला असता, तरी तोपर्यंत त्यांच्या कॉफिनचं दफन झालं असतं; मग त्यांचा जीव वाचू शकला नसता.