पानिपत, 14 ऑक्टोबर : एकदा प्रेमात पडल्यानंतर व्यक्तीला काय चूक आणि काय बरोबर हे समजत नसल्याचं अनेकदा म्हटल जातं. ही बाब सिद्ध करणारी काही उदाहरणं देखील घडून गेलेली आहेत. हरियाणातील पानिपत शहरात अशीच एक घटना समोर आली आहे. पानिपतमधील भीमनगरमध्ये राहणारा एक मुलगा आणि ओडिशाच्या रुरकेलामध्ये राहणारी एक मुलगी ऑनलाईन गेम (Online Game) खेळताना एकमेकांच्या प्रेमात (Love) पडले. मुलासोबत लग्न करण्यासाठी मुलीने तब्बल 1 हजार 650 किलोमीटरचा प्रवास करून त्याचं घर गाठलं. अल्पवयीन मुलाचे कुटुंबीय दोघांचे लग्न देखील लावणार होते. मात्र, जिल्हा महिला संरक्षण आणि बालविवाह प्रतिबंधक विभागाच्या सतर्कतेमुळे हे लग्न थांबवण्यात यश आलं.
या प्रकरणातील मुलगा मूळचा उत्तर प्रदेशातील गोरखपूरचा रहिवासी आहे. 20 वर्षांपासून त्याच कुटुंब पानिपतमध्ये वास्तव्याला आहे. तर, मुलीचं कुटुंब बिहारच्या बेगूसराय जिल्ह्यातील असून, काही वर्षांपूर्वी ते ओडिशा येथे स्थलांतरित झाले होते. तिथे रुरकेला रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये ते वास्तव्याला आहेत. काही दिवसांपूर्वी लुडो किंगवर (Ludo King) ऑनलाइन गेम खेळताना संबंधित मुलाची आणि मुलीची ओळख झाली. त्यानंतर दोघांनी फेसबुकवर गप्पा मारण्यास सुरुवात केली. कालांतराने मैत्रीच रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.
याबाबत मुलीने आपल्या घरी कल्पना दिली होती. मात्र, मुलीच्या कुटुंबियांनी आणखी एक-दोन वर्ष लग्न लावून देण्यास नकार दिला. परिणामी मुलगी 2 ऑक्टोबर रोजी घर सोडून थेट पानिपतला पोहोचली, अशी माहिती जिल्हा महिला संरक्षण आणि बालविवाह प्रतिबंधक अधिकारी रजनी गुप्ता यांनी दिली.
मुलीने आपल्या मोठ्या बहिणीला घर सोडण्याची कल्पना देऊन काही पैसे घेऊन घर सोडलं होतं. रुरकेला ते पानीपत असं तब्बल 1 हजार 650 किमी अंतर कापून ती मुलाकडे आली. मुलाने तिला आपल्या घरी नेलं. त्यानंतर मुलाच्या नातेवाईकांनी लग्नासंदर्भात मुलीच्या कुटुंबियांशी संपर्क साधून चर्चा केली. मात्र, त्यांनी पानिपतला येण्यास नकार दिला. त्यानंतर मात्र, मुलाच्या नातेवाईकांनी सोमवारी (४ ऑक्टोबर) दोघांचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला. कुणीतरी या प्रकरणातील मुलगा अल्पवयीन असल्याची माहिती चाइल्ड हेल्पलाइनला दिली. त्यानंतर जिल्हा महिला संरक्षण आणि बालविवाह प्रतिबंधक विभागाने लग्नस्थळी धाव घेतली.
अधिक चौकशी केली असता, आधार कार्डवरील जन्म तारखेनुसार मुलाचं वय 20 वर्ष 8 महिने (कायद्यानुसार मुलाच लग्नाचं योग्य वय 21 वर्ष निश्चित केलेलं आहे) आणि मुलीचं वय 19 वर्ष असल्याच लक्षात आलं. मुलगा अल्पवयीन असल्याच समोर आल्यानंतर लग्न समारंभ थांबण्यात आला, असं देखील रजनी गुप्ता यांनी सांगितलं.
दरम्यान, जिल्हा महिला संरक्षण आणि बालविवाह प्रतिबंधक विभागाने मुलगा आणि मुलीच्या शैक्षणिक कागदपत्रांची मागणी केली आहे. तोपर्यंत एक प्रतिज्ञापत्र घेऊन लग्न थांबवण्यात आलं आहे. मुलाच्या नातेवाईकांनी दोन ते तीन दिवसात वयाचा पुरावा देणारी आवश्यक ती कागदपत्रे कार्यालयात जमा करावीत. तोपर्यंत मुलीला मुलाच्याचं घरी ठेवण्याच्या, सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Couple