मुंबई, 19 मार्च : सोशल मीडियावर गेल्या काही महिन्यांपासून राहत इंदौरी यांची बुलाती है मगर जाने का नही ही गझल धुमाकूळ घालत आहे. त्यावरून अनेक मीम्स आली. टिकटॉकवरही याचा ट्रेंड आहे. आता कोरोना व्हायरसच्या विळख्यात देश सापडला असताना याच गझलचा वापर करून मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. कोरोना व्हायरसमुळं मोठे कार्यक्रम आयोजन करण्यास तसंच गर्दी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी गर्दी करू नये, अंतर राखावं असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. त्यातच मुंबई पोलिसांनी ‘बुलाती है मगर जाने का नही’ म्हणत लोकांनी गर्दी करू नये असं म्हटलं आहे. मुंबई पोलिसांनी ट्विटरवरून एक मीम शेअर केलं आहे. त्यामध्ये प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचा फोटोसुद्धा आहे. त्यावर राहत इंदौरी यांनी मास्क घातल्याचंही दाखवलं आहे. तसंच मीम शेअर करताना त्याला ‘जो वायरस है वो फैलाने का नहीं।’ असा कॅप्शन दिला आहे.
Jo Virus Hai Vo Phaillane Ka Nai! #TakingOnCorona #Coronavirus #CovidIndia pic.twitter.com/en3BHGFohh
— मुंबई पोलीस - Mumbai Police (@MumbaiPolice) March 19, 2020
कोरोना संसर्गजन्य असून वेगानं पसरत आहे. त्यामुळं तो जास्त पसरू नये यासाठी काळजी घ्या असा संदेश पोलिसांनी दिला आहे. व्हायरस पसरू नये यासाठी लोकांनी घरातच रहावं. तसंच स्वच्छतेबाबत जागरूक राहण्यास सांगितलं आहे.
राहत इंदौरी यांची गझल ‘बुलाती है मगर जाने का नईं। ये दुनिया है इधर जाने का नईं, मेरे बेटे किसी से इश्क कर, मगर हद से गुजर जाने का नईं
याआधीही मुंबई पोलिसांनी अशा मीम्समधून लोकांमध्ये जनजागृती केली आहे. आताच्या वातावरणात मुंबई पोलिसांचा हा क्रिएटीव्ह प्रयत्न लोकांनाही आवडला आहे. त्यावर नागरीक सुद्धा इतरांना काळजी घेण्यास सांगत आहेत. हे वाचा : आखाती देशांतील तब्बल 26 हजार भारतीय मुंबईत होणार दाखल, पवईत करणार क्वारंटाइन जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात या व्हायरसने 8,000 पेक्षा जास्त लोकांचा जीव घेतला आहे, तर 2 लाखांपेक्षा जास्त लोकांना याची लागण झाली आहे. भारतात 168 रुग्ण आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. हे वाचा : कोरोनाचा खरा फटका असा बसणार! या कर्मचाऱ्यांचे पगार कमी होण्याचा धोका