उत्तम कामाचा मोबादला म्हणून कंपनीनं दिली थेट चंद्रावर जमीन, तरुणाचा आनंद गगनात मावेना

उत्तम कामाचा मोबादला म्हणून कंपनीनं दिली थेट चंद्रावर जमीन, तरुणाचा आनंद गगनात मावेना

छोट्या गावातल्या इफ्तेखार रहमानी या तरुण इंजिनिअरचीही आता चंद्रावर एक एकर जमीन (Land on Moon) आहे.

  • Share this:

दरभंगा 01 मार्च : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचं नाव गेलं वर्षभर चर्चेत आहे ते त्याच्याआत्महत्यांसाठी. त्यापूर्वी त्याचं नाव त्याच्या सिनेमांसाठी जसं चर्चेत होतं, तसंच त्याने चंद्रावर जमीन (Land on Moon) विकत घेतल्याच्या कारणावरूनही ते चर्चेत होतं. देशातल्या आणखीही काही व्यक्तींची नावं चंद्रावर जमीन घेतल्याच्या कारणावरून अधूनमधून चर्चेत येत असतात. असंच आता एक नाव चर्चेत आलं आहे एका सॉफ्टवेअर इंजिनीअरचं.

बिहारच्या (Bihar) दरभंगा (Darbhanga) जिल्ह्यातल्या बहेडा (Baheda) या छोट्या गावातल्या इफ्तेखार रहमानी या तरुण इंजिनिअरचीही आता चंद्रावर एक एकर जमीन आहे. मात्र ती त्याने विकत घेतलेली नव्हे, तर तो काम करत असलेल्या अमेरिकन कंपनीने ती त्याला चक्क 'गिफ्ट' म्हणून दिली आहे. आहे की नाही आश्चर्याची गोष्ट! 'आज तक'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. त्याला एवढं मौल्यवान गिफ्ट कंपनीने का दिलं, याचीही एक गोष्ट आहे.

सध्या नोएडात असलेल्या इफ्तेखारचं मूळ गाव बिहार राज्याच्या दरभंगा जिल्ह्यातलं बहेडा. तो नोएडात (Noida) एआर स्टुडिओज या नावाची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी चालवतो. तसंच, लुनार सोसायटी इंटरनॅशनल (Lunar Society International) या अमेरिकन कंपनीसाठीही काम करतो. ही कंपनी चंद्रावरच्या जमिनीच्या खरेदी-विक्रीचं काम करते. त्या कंपनीच्या सॉफ्टवेअरमध्ये इफ्तेखारने काही सुधारणा केल्या आणि ते अपडेट केलं. त्यामुळे कंपनीला बराच फायदा झाला. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कंपनीने त्याला चंद्रावरची एक एकर जमीन चक्क गिफ्ट म्हणून देऊन टाकली.

इफ्तेखारने स्वतः व्हिडिओद्वारे या बातमीला दुजोरा दिला आहे. चंद्रावर जमीन मिळाल्यानंतर आपण एखाद्या सेलेब्रिटीप्रमाणे चर्चेत आलो आहोत, असं त्यानं म्हटलं आहे. तो सध्या नोएडातच आहे. पण ही बातमी त्याच्या बहेडा या गावी पोहोचल्यावर त्याच्या गावातही आनंदाचं वातावरण पसरलं. त्याच्या कुटुंबीयांनी एकमेकांचं तोंड गोड करून हा आनंद साजरा केला.

आपली आई नासरा बेगम यांना इफ्तेखारने ही आनंदाची बातमी फोन करून सांगितली. आपल्या मुलाने मिळवलेल्या या यशाबद्दल आपण अतिशय खूश असल्याचं त्यांनी सांगितलं. 'माझा मुलगा जगभर नाव कमावतोय. 'ऊपरवाला' त्याला असंच यश देवो, हीच मनापासून प्रार्थना,' अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

इफ्तेखारचे काका मोहम्मद रोशन यांनी तो लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार असल्याची आठवण सांगितली. त्याचं प्राथमिक शिक्षण बहेडा गावातच झालं. त्यानंतर बाहेरगावी जाऊन त्याने बीटेक ही पदवी घेतली आणि सॉफ्टवेअर इंजिनीअर झाला. आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा त्याने योग्य पद्धतीने उपयोग केल्याने कंपनीला फायदा झाला आणि त्यामुळे त्याला एवढं अनोखं गिफ्ट मिळालं आहे. त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Published by: Kiran Pharate
First published: April 1, 2021, 2:49 PM IST

ताज्या बातम्या