कानपूर, 6 नोव्हेंबर : सणासुदीच्या निमित्तानं देशातील अनेक राज्यांमध्ये जनावरांचे बाजार (Animal Market) भरतात. लाखो रुपयांची उलाढाल हे या बाजारांचं वैशिष्टय म्हणता येईल. या बाजारांमध्ये संबंधित भागातील गायी, म्हशी, बैल, बोकड, शेळ्या आणि गाढवांसारखी जातिवंत जनावरं पाहायला मिळतात. या बाजारांमध्ये ज्या प्रमाणे व्यापारी खरेदी -विक्री करतात, त्याचप्रमाणे शेतकरी देखील जनावरं खरेदी विक्रीसाठी अशा बाजारांना प्राधान्य देतात. सध्या देशभरात दिवाळीची (Diwali) धामधूम सुरू आहे. या सणासुदीच्या काळात उत्तर प्रदेशातील चित्रकूट (Chitrakoot) येथील गाढवांचा बाजार (Donkey Market) विशेष चर्चेत आला आहे. अर्थात त्याला कारणही तसंच आहे. या बाजारात यंदा गाढवांची खरेदी विक्रीची किंमत 10 हजारांपासून 10 लाख रुपयांपर्यंत होती. यात शाहरुख नावाच्या गाढवाला दहा लाख रुपये तर सलमान खान नावाच्या एका गाढवाला सात लाख रुपये अशी विक्रमी किंमत मिळाली. याविषयीचं वृत्त `दैनिक जागरण`ने दिलं आहे.
शहरांपासून दूर गावोगावी भरणाऱ्या जनावरांच्या बाजाराची परंपरा आजही कायम आहे. दिवाळीच्या कालावधीत आध्यात्मिक सोहळ्यांसाठी ऐतिहासिक चित्रकूट नगरी दरवर्षी चर्चेत असते. या सोहळ्यांसोबतच येथे भरणारा गर्दभ किंवा गाढवांचा बाजार हा देखील लोकांचा कुतूहलाचा विषय ठरतो. या बाजारात अनेक राज्यांमधून विविध जातीची गाढवं दाखल होतात. त्यामुळे हे गाढव खरेदीचं मोठं केंद्र मानलं जातं. विविध प्रकारची, जातीची गाढवं पाहण्यासाठी लोकांची या बाजारात मोठी गर्दी उसळते. या बाजारात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि बिहारमधील विविध जिल्ह्यांमधील व्यापारी आणि गरजू गाढवांच्या खरेदी -विक्रीसाठी येतात. यंदा देखील चित्रकूट मधील मंदाकिनी नदीकिनारी (Mandakini River) मोठ्या प्रमाणावर गाढवांचा बाजार भरला होता. या बाजारात गाढवांना 50 हजारांपासून ते 12 लाख रुपयांपर्यंत दर मिळाला.
हे ही वाचा-सुरक्षेची जबाबदारी घेणाऱ्यानेच केला घात; उल्हासनगरात मुद्देमाल घेऊन वॉचमन फरार
चित्रकूट मधील मंदाकिनी नदीकिनारी भरणाऱ्या या बाजाराला सुमारे 100 वर्षांची परंपरा आहे. हा बाजार मुघल बादशाह औरंगजेबनं सुरू केला. या बाजारात किंवा जत्रेत मुघल सैन्याच्या ताफ्यातील गाढवं आणि खेचर आणले जात. तेव्हापासून आजतागायत ही परंपरा कायम आहे. सतना (Satna) जिल्हा परिषदेच्या वतीनं भरवल्या जाणाऱ्या या बाजारात गाढवांच्या उंची, शरीरयष्टी आदी गोष्टी पाहून व्यापारी बोली लावतात. ही बोली साधारण 5 हजारांपासून सुरू होते आणि लाखो रुपयांपर्यंत जाते.
या जनावरे बाजारात यंदादेखील गाढवांची नावं ही बॉलिवूड (Bollywood) कलाकार आणि नेत्यांच्या नावावरून ठेवण्यात आली होती. या बाजारात सर्वात जास्त किंमत शाहरूख नावाच्या गाढवाला मिळाली. शाहरुख नावाचं गाढव 10 लाख रुपयांना खरेदी करण्यात आलं. सलमान नावाच्या गाढवावर 7 लाखांची बोली लागली होती. या सोबतच ऋतिक आणि रणबीर नावाच्या गाढवांनाही चांगली किंमत मिळाली. या नावाच्या गाढवांची प्रत्येकी 5 लाख रुपयांना खरेदी करण्यात आली. दिपिका नावाच्या गाढवाची विक्री एक लाख पंचवीस हजार रुपयांना झाली. एका अनुमानानुसार या बाजारात यंदा सुमारे 5 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचं सांगण्यात आलं. गाढवांव्यतरिक्त या बाजारात अश्व (Horse) आणि खेचरांचीही खरेदी-विक्री झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Pet animal