• Home
  • »
  • News
  • »
  • crime
  • »
  • सुरक्षेची जबाबदारी घेणाऱ्यानेच केला घात; उल्हासनगरात साडे सात लाखांचा मुद्देमाल घेऊन वॉचमन फरार

सुरक्षेची जबाबदारी घेणाऱ्यानेच केला घात; उल्हासनगरात साडे सात लाखांचा मुद्देमाल घेऊन वॉचमन फरार

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

  • Share this:
उल्हासनगर, 6 नोव्हेंबर : ज्यांच्यावर इमारतीच्या सुरक्षेची जबाबदारी देऊन आपण निश्चिंत होतो, त्याच वॉचमनने एका कुटुंबाचा विश्वासघात केल्याचं वृत्त समोर आलं आहे. एका ७६ वर्षीय वृद्धेला वॉचमनने आपल्या साथीदारांच्या मदतीने मालकीणीला बांधून घर लुटल्याच्या धक्कादायक प्रकार (Crime News) उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar News) समोर आला आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली असून वॉचमन नेमताना त्याची संपूर्ण माहिती तापासूनच काम द्यावे अशी चर्चा सुरू झाली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प ३ मधील सेक्शन २० मध्ये शुक्रवारी दिवसाढवळ्या ही घटना घडली. या भागात असलेल्या लिला व्हिला इमारतीत व्यावसायिक मनोजकुमार बजाज हे त्यांच्या आई, पत्नी आणि मुलासह वास्तव्याला आहेत. शुक्रवारी मनोज हे नेहमीप्रमाणे त्यांच्या व्यवसायासाठी निघून गेले, तर मनोज यांची पत्नी आणि मुलगा दुपारी एका नातेवाईकांकडे गेले. यावेळी मनोज यांची ७६ वर्षीय आई लाजवंती बजाज या घरात एकट्याच होत्या. हीच संधी साधत त्यांच्या इमारतीचा नेपाळी वॉचमन दीपक हा पार्सल देण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरात आला. हे ही वाचा-लग्न लावून देत नसल्याने तरुणाला राग अनावर; जन्मदात्या बापाची कुऱ्हाडीने हत्या यानंतर त्याने लाजवंती यांना पाणी मागितलं. पाणी देण्यासाठी लाजवंती मागे वळताच त्याचे आणखी दोन साथीदार हे कटावणी, मोठे स्क्रू ड्रायव्हर घेऊन घरात घुसले. त्यांनी आधी लाजवंती यांचे हातपाय सेलो टेपने बांधून ठेवले. मात्र त्यांनी प्रतिकार केल्यानं या तिघांनी त्यांच्या तोंडात बोळा कोंबत त्यांचा आवाज दाबला. त्यानंतर घरातली दोन कपाटं फोडून त्यातून ४ लाख ७० हजार रुपयांची रोख रक्कम, दागिने असा सरकारी मूल्यानुसार सुमारे साडेसात लाख रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. ही जबरी चोरी करून इमारतीतून पळून जाताना चार जण सीसीटीव्हीत कैद झाले. या घटनेनंतर काही वेळाने लाजवंती यांची सून आणि नातू हे घरी आले असता त्यांना लाजवंती या सेलोटेपने गुंडाळलेल्या अवस्थेत दिसल्या. त्यामुळं त्यांनी त्यांची सुटका केली असता, इमारतीचा वॉचमन दीपक यानेच त्याच्या साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याची धक्कादायक बाब समोर आली. याप्रकरणी मनोज बजाज यांच्या तक्रारीनुसार मध्यवर्ती पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून दीपकच्या शोधासाठी ८ टीम रवाना करण्यात आल्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे. तर क्राईम ब्रँचकडूनही या प्रकरणाचा स्वतंत्र तपास सुरू करण्यात आलाय.मागील महिन्यात एका ७० वर्षीय वृद्धेवर देखील तिच्यात घरात फ्लॅट विकणाऱ्या ब्रोकर ने प्राणघातक हल्ला केला होता,आता अवघ्या १५ दिवसात वृद्धांना लक्ष केल्याची ही दुसरी मोठी घटना घडली आहे.त्यामुळे नागरिकांनी वृद्धांना घरात एकटं सोडता सतर्क राहावे असे आवाहन केले जात आहे.
Published by:Meenal Gangurde
First published: