मुंबई 1 डिसेंबर : वराने चुंबन घेतलं हे लग्न मोडण्याचं कारण आहे, असं सांगितलं तर कोणालाही खरं वाटणार नाही; पण याच कारणामुळे उत्तर प्रदेशात नुकतंच एक लग्न मोडलं आहे. कारण हेच असलं तरी त्यामागची पार्श्वभूमी वेगळी आहे. वराने लग्नाच्या मंडपात स्टेजवर असताना सुमारे 300 पाहुण्यांसमोर वधूचं चुंबन घेतलं. ते वधूला आवडलं नाही आणि हे नवपरिणित दाम्पत्य लग्नगाठी बांधल्यानंतर लगेचच विभक्त झालं. मंगळवारी (29 नोव्हेंबर) रात्री हे लग्न होतं. लग्नाचे विधी झाले आणि वधू-वरांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले. त्यानंतर लगेचच वराने वधूचं चुंबन घेतलं. या घटनेमुळे सारेच अचंबित झाले. वधूलाही याची काहीही पूर्वकल्पना नव्हती. त्यामुळे तिच्या मनात अपमानाची भावना निर्माण झाली. ती तातडीने स्टेजवरून उतरली आणि थोड्या वेळाने तिने थेट पोलिसांनाच पाचारण केलं. हे ही वाचा : आपल्याच भावासोबत रिलेशनशिपमध्ये होती तरुणी, एका गोष्टीने पलटलं संपूर्ण नात्याचं समीकरण ही नववधू 23 वर्षांची असून, पदवीधर आहे. या प्रकारामुळे तिने वराच्या चारित्र्यावरच संशय घेतला आहे. वराने त्याच्या मित्रांशी लावलेली पैज जिंकण्यासाठी स्टेजवर आपलं चुंबन घेतलं असा आरोप नववधूने केला आहे. या सगळ्या प्रकारानंतर दोन्ही बाजूंच्या अर्थात वर आणि वधू या दोन्हींकडच्या मंडळींची वरात पोलिस स्टेशनला गेली. तिथे वधूने असाही आरोप केला, की वराने तिला आधी चुकीच्या पद्धतीने स्पर्शही केला होता; मात्र सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. ‘जेव्हा त्याने माझं चुंबन घेतलं, तेव्हा मला अपमानास्पद वाटलं. माझ्या आत्मसन्मानाचा विचार त्याने केला नाही आणि अनेक पाहुण्यांच्या समोर माझ्याशी त्याने गैरवर्तन केलं,’ असं नववधू म्हणाली. या प्रकरणात पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; मात्र नववधूने माघार घेण्यास नकार दिला. त्यानंतर लग्नसोहळा रद्द करण्यात आला आणि सारे पाहुणे आपापल्या घरी परतले. हे ही पाहा : समुद्रात गर्लफ्रेंडला प्रपोज करायला गेला खरा पण, त्यानंतर जे घडलं ते… पाहा Video नववधूची आई म्हणाली, ‘वराच्या मित्रांनी त्याला चिथावणी दिली. त्यामुळे त्याने असं कृत्य केलं. आम्ही आमच्या मुलीचं मन वळवण्याचा प्रयत्न केला; मात्र तिने त्याच्याशी लग्न करण्यास नकारच दिला. आता आम्ही काही दिवस थांबण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून तिला काही तरी विचार करण्यास वेळ मिळेल.’ पोलिस म्हणाले, ‘तांत्रिकदृष्ट्या पाहायला गेलं, तर हा प्रसंग घडला तोपर्यंत सारे विधी आटपले होते. त्यामुळे हे दाम्पत्य त्या वेळी विवाहित होतं. त्यामुळे आम्ही काही दिवस थांबू आणि वातावरण निवळण्याची वाट पाहून पुढे काय करायचं याचा निर्णय घेऊ.’ अलीकडेच, लखीमपूर खेरी आणि शाहजहानपूरमध्ये दोन वधूंनी आपलं लग्न मंडपातच मोडलं होतं. त्यांच्या वराने लग्नात नागीन डान्स केला. ते त्यांना आवडलं नसल्याने त्यांनी आपलं लग्न मोडलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.