रांची 05 मे : बँड बाजासह वरात घेऊन नवरदेव नवरीकडे पोहोचला. मात्र, लग्न कोणीतरी दुसरंच करून गेलं. नवरदेवासमोरच नवरीचा प्रियकर स्टेजवर आला आणि त्याने नवरीच्या डोक्यात कुंकू भरलं. या घटनेनंतर नवरी आणि नवरदेवाकडील लोकांनी त्याची चांगलीच धुलाई केली. या घटनेनंतर रात्रीच वऱ्हाडी वरात घेऊन परतले आणि सकाळी पंचायत तसंच लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने तरुणीचं तिच्या प्रियकराशी लग्न लावून देण्यात आलं. हे संपूर्ण प्रकरण हजारीबागच्या ईचाक ब्लॉकमधील खुत्रा गावातील बेरिटांड मोहल्लाशी संबंधित आहे. जिथे बुधन रामची मुलगी प्रीती कुमारी हिचा विवाह कटकमदाग ब्लॉकच्या बनहे गावातील रहिवासी सागर कुमारसोबत निश्चित झाला होता. 3 मे रोजी वधूला घेण्यासाठी सागर कुमार लग्नाची वरात घेऊन बुधन रामच्या घरी पोहोचला. जयमाला मंचावर वरमाळा सोहळा झाला. यानंतर मुलगा आणि मुलगी एकमेकांना मिठाई खाऊ घालत होते. त्यानंतर अचानक तरुणीचा प्रियकर सनी कुमार आपल्या मित्रांसोबत इथे आला.
सनीने सोबत सिंदूर आणला होता. अचानक तो स्टेजवर चढला. लग्नातील पाहुणे आणि ग्रामस्थांसमोर त्यानी वधूच्या डोक्यात सिंदूर भरला. हे दृश्य पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. मात्र, तत्काळ दोन्ही बाजूच्या लोकांनी प्रियकर आणि त्याच्या मित्रांना पकडून बेदम मारहाण केली. त्यानंतर रात्री नवरदेवाकडील वऱ्हाडी आपल्या घरी परतले. येथे सकाळी पंचायत झाली आणि सर्वांच्या संमतीने तरुणीचं तिच्या प्रियकराशी लग्न लावण्यात आलं. यानंतर मुलगी माहेरच्या घरातून प्रियकराच्या घरी गेली. मुलीचे वडील बुधन राम यांनी सांगितलं की, सनी कुमार बरही ब्लॉकच्या कडवा गावात त्याच्या आजोबांच्या घरी राहत होता. तिथे गावकऱ्यांनी मुलीला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून त्याला हकलून दिलं होतं. त्यानंतर तो खुटरा गावात आपल्या भावाच्या घरी राहू लागला. यादरम्यान तो प्रितीच्या जवळ आला. दोघांच्या प्रेमप्रकरणाची आपल्याला माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे मुलीचं लग्न दुसऱ्या ठिकाणी ठरलं. पंचायत आणि लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने मुलीचा विवाह तिचा प्रियकर सनी कुमार याच्यासोबत लावण्यात आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आलेली नाही.