मुंबई, 07 जुलै : लग्न झाल्यानंतर नवरा-बायकोचं सूत जुळलं नाही किंवा त्यांच्यातील वाद विकोपाला गेले की एकमेकांपासून वेगळं होण्याचा पर्याय स्वीकारला जातो. यालाच आपण घटस्फोट म्हणतो. अलीकडील काही वर्षांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण वाढल्याचं चित्र आहे. घटस्फोटाबद्दल नुकतीच एक रंजक माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार, फक्त माणूसच नाही तर पक्षीदेखील एकमेकांना घटस्फोट देतात. एकमेकांपासून वेगळं होण्याची प्रक्रिया वेगवेगळ्या प्रजातींमध्ये लक्षणीयरीत्या बदलते. पक्षी प्रामुख्याने त्यांच्या एकपत्नीत्व प्रणालीसाठी ओळखले जातात. कमीत कमी एका प्रजनन हंगामासाठी ते एकाच जोडीदारासोबत राहतात. आता मात्र, याबाबत नवीन माहिती समोर आली आहे. मानवामध्ये ‘घटस्फोट’ म्हणून संबोधल्या जाणार्या प्रक्रियेद्वारे पक्षी आपली भागीदारी संपुष्टात आणत असल्याचं संशोधकांच्या निदर्शनास आलं आहे. ‘प्रोसिडिंग्ज ऑफ द रॉयल सोसायटी’ या जर्नलमध्ये याबाबत एक रिसर्च प्रकाशित झाला आहे. या रिसर्चमध्ये चीन आणि जर्मनीच्या संशोधकांनी घटस्फोट प्रमाणावर परिणाम करणारे प्राथमिक घटक ओळखण्यासाठी 232 पक्ष्यांच्या प्रजातींमधील घटस्फोटाबाबत पूर्वी प्रकाशित केलेल्या डेटाचं परीक्षण केलं. संशोधकांनी असा शोध लावला की, पक्ष्यांमधील घटस्फोटामागील कारणं माणसांसारखीच असू शकतात, जसं की लैंगिक संघर्ष आणि आसपासच्या वातावरणातील तणाव. हेही वाचा - Viral News : असे प्राणी जे उडू शकतात, पण पक्षी नाही, पाहा PHOTOS संशोधकांनी घटस्फोटाचं प्रमाण आणि विविध घटकांमधील परस्परसंबंधांचं विश्लेषण केलं. ज्यामध्ये दोन्ही लिंगांचे लैंगिक संबंध, बहुपत्नीत्वाची प्रवृत्ती, स्थलांतराचं अंतर आणि प्रौढ मृत्युदर यांचा समावेश आहे. संशोधकांनी असं निरीक्षण नोंदवलं की, नर संभोगाचा घटस्फोटाच्या प्रमाणाशी सकारात्मक संबंध आहे. त्यांना असंही आढळलं की, स्थलांतराच्या अंतरामुळे पक्ष्यांच्या घटस्फोटाच्या प्रमाणावर लक्षणीय परिणाम केला आहे. तर, प्रौढ मृत्यू दराचा घटस्फोटाशी कोणताही थेट संबंध नाही. हेही वाचा - VIRAL NEWS : गाढवासह असे 8 प्राणी जे उभ्या उभ्याच झोपतात; पण आपल्यासारखा त्यांचा तोल का जात नाही? निष्कर्ष दर्शवतात की, उच्च घटस्फोट दर असलेल्या प्रजाती अनेकदा एकमेकांशी जवळून संबंधित होत्या. घटस्फोटाचं प्रमाण कमी असलेल्या प्रजातींमध्येदेखील हा पॅटर्न आढळला आहे. दोन्ही ठिकाणी नराचा बाहेरख्यालीपणा हा एक समान घटक आढळला आहे. रिसर्च टीमनं आपल्या पेपरमध्ये म्हटलं आहे की, “हे निष्कर्ष सूचित करतात की, पक्ष्यांमध्ये घटस्फोट हे एक साधं अॅडॅप्टिव्ह (लैंगिक निवडीद्वारे चालवलेला) किंवा नॉन-अॅडॅप्टिव्ह धोरण (जोडीदाराच्या अपघाती निधनामुळे) असू शकत नाही. त्याऐवजी, ते लैंगिक संघर्ष आणि आजूबाजूच्या वातावरणातील तणावाच्या प्रतिसादांचं संयोजन असू शकतं.”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.