मुझफ्फरपूर, 17 ऑगस्ट : कोरोनामुळे अनेक भागांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलं आहे. बिहारमधील लॉकडाऊन दरम्यान पोलिसांनी क्रौर्याची परिसीमा ओलांडल्याचं समोर आलं आहे. बिहारच्या मुझफ्फरपूरमधील एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. बिहारमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन असताना एका व्यक्तीनं रविवारी दुकान उघडल्यानं त्याला दोन पोलिसांनी लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हा व्हिडीओ मुझफ्फरपूरच्या बरुराज पोलिस स्टेशन परिसरातील फुलवारिया चौकातील असल्याचे सांगितले जात आहे. मारहाण झालेल्या तरुणाचं नाव सुरेंद्र असल्याची माहिती मिळाली आहे.
हे वाचा- मुलांनी बापाचे पार्थिव नेले सायकलवर अन् अख्खे गाव फक्त पाहत होते! रविवारी शहरात लॉकडाऊनची घोषणा केली असतानाही या तरुणानं दुकानं उघडल्यानं तिथे बाचाबाची झाली आणि त्यानंतर पोलिसांनी सुरेंद्रला जमिनीवर आपटून मारहाण केली. शनिवारी व रविवारी दूध आणि औषध वगळता सर्व दुकाने जिल्ह्यातच बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार रविवारी संध्याकाळी फुलवारीया चौकात काही दुकाने उघडली होती. पोलिसांना पाहून बरेच लोक पळून गेले पण दोन दुकानदार पकडले गेले. यावेळी एकाने स्वत: ला पोलिसांच्या स्वाधीन केले परंतु सुरेंद्र यांनी दुकान उघडण्यासाठी साफसफाई सुरू केली. त्यावेळी संतापलेल्या पोलिसांनी त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

)







