शिमला, 3 ऑक्टोबर : माणूस जसजसा जंगलं नष्ट करू लागला आहे, तसंतसं जंगली (Wild animals enters in human residence) श्वापदांचं मानवी वस्तीत होणारं आक्रमण वाढू लागलं आहे. अनेकदा जंगली श्वापदं मानवी वस्तीत घुसतात आणि अशा वेळी काय नेमकं काय करावं, हे अनेकांना समजत नाही. घरात अजगर घुसल्याची एक घटना नुकतीच समोर आली आहे. मात्र या संकटसमयी तरुणानं दाखवलेलं प्रसंगावधान आणि धैर्य यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.
अजगर घुसलं घरात
हिमाचल प्रदेशातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असणाऱ्या नालागढ परिसरात माजरा नावाचं छोटंसं गाव आहे. या गावातील एका घरात 10 ते 12 फुटी (Big Python in Nalagarh) अजगर घुसलं. हे महाकाय अजगर पाहून सर्वांची भीतीनं गाळण उडाली. काय करावं, हे कुणालाही कळेना. तिथं उपस्थित असणाऱ्या एका तरुणानं सर्वांना अजगरापासून काही अंतर दूर थांबायला सांगितलं आणि एक कल्पना लढवली.
यूट्यूब व्हिडिओची मदत
या तरुणानं अजगर कसं पकडावं, याविषयीचा एक व्हिडिओ नुकताच यूट्यूबवर पाहिला होता. त्यात दिलेल्या सूचनांचं पालन करत अजगराला पकडायचं त्यानं ठरवलं. आपली ही कल्पना त्यानं इतर ग्रामस्थांना सांगितली आणि आपल्या सूचनांचं पालन करण्याची विनंती केली.
असं पकडलं अजगर
एक काठी, एक पिशवी आणि एक पाईप या तीन वस्तूंच्या मदतीनं त्याने अजगर पकडण्याची प्रक्रिया सुरु केली. सुरुवातीला काठीच्या मदतीने त्याने अजगराला भिंतीकडेला ढोसललं. त्यानंतर पाईपचा वापर करत अजगराला पिशवीत कोंबलं आणि पिशवीला गाठ मारली. अजगर पिशवीत बंद झाल्यानंतर गावकऱ्यांनी त्याला जंगलात नेऊन दूरवर सोडून दिलं. सुदैवाने यात कुणीही जखमी झालं नाही किंवा अजगराने कुणावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला नाही.
हे वाचा - दुबईच्या 'बुर्ज खलिफा'वर झळकली महात्मा गांधींची प्रतिमा, VIDEO होतोय VIRAL
वृक्षतोड थांबवण्याची मागणी
नालागढ परिसरात गेल्या काही वर्षांपासून बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. परिणामी बिबटे, रानडुकरं, अजगरं यासारखे प्राणी मानवी वस्तीत येतात. जंगलतोड थांबवली, तरच हे प्रकार थांबतील, अन्यथा मानवी वस्तीत प्राणी शिरण्याचं प्रमाण सुरूच राहिल, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Himachal pradesh, Python, Viral video.