मुंंबई, 21 जानेवारी : जगातील खगोलशास्त्रज्ञांच्या निरीक्षणात शहरांमधील कृत्रिम प्रकाश गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं अडथळा आणत आहे. शहरातील कृत्रिम प्रकाशामुळे लोकांना आकाशातील तार्यांचे निरीक्षण करण्यात येणाऱ्या अडचणींमध्ये वेगानं वाढ होत आहे. कारण रात्रीच्या वेळी कृत्रिम प्रकाशात तार्यांमधून येणारा प्रकाश मिसळतो, व त्यामुळे खगोलशास्त्रज्ञ आणि तार्यांचे निरीक्षण करणार्यांना लोकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. याविषयी करण्यात आलेल्या अभ्यासात आढळून आले आहे की, 8 वर्षांपूर्वीच्या तुलनेत सध्याचा रात्रीचा कृत्रिम प्रकाश दुपटीनं वाढला असून, ज्याचं मुख्य कारण वेगानं होणार प्रकाश प्रदूषण आहे.
पृथ्वीवरील प्रकाश झपाट्यानं वाढतोय
गेल्या काही वर्षांत वेगानं शहरीकरण होत असून शहरी भागाची व्याप्ती विस्तारत आहे. यामुळेच जगात रात्रीचा प्रकाश वाढत असून त्याची व्याप्तीही विस्तारत आहे. ज्यामुळे आकाशातील ताऱ्यांचं निरीक्षण करणं अधिक कठीण झालं आहे. कारण रात्रीच्या वेळी ताऱ्यांकडून पृथ्वीच्या दिशेने येणारा प्रकाश पृथ्वीवरील प्रकाश प्रदूषणात मिसळतो.
काय आहेत तोटे?
जगासाठी प्रकाश प्रदूषणाची समस्या नवीन नाही. 1973 मध्ये, खगोलशास्त्रज्ञ कर्ट रीगेलने इशारा दिला होता की, कृत्रिम प्रकाश आपल्या रात्रीचं दृश्य वेगानं बदलत आहे. तेव्हापासूनचा अभ्यास केला, तरी तुमच्या लक्षात येईल की, विस्तारत असलेल्या शहरी भागात प्रकाश प्रदूषण वाढत आहे. ज्याचा पर्यावरणावर आणि अंधारावर अधिक अवलंबून असलेल्या सजीवांवर विपरित परिणाम होत आहे.
तर, दुर्बिणीशिवाय पर्याय राहणार नाही
एका नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की, जगभरातील सर्वत्र रात्रीचे आकाश कृत्रिम प्रकाशामुळे अधिकच प्रकाशमान झाले आहे. प्रकाश प्रदूषणाचा हा वाढणारा वेग यापूर्वी उपग्रह दाखवत होते, त्यापेक्षा खूप जास्त आहे. म्हणजेच आता कृत्रिम प्रकाशामुळे रात्रीच्या वेळी आकाशातील ताऱ्यांचा प्रकाश आपल्याला पाहता येणार नाही, व आकाशातील ताऱ्यांचे निरीक्षण व अभ्यास करण्यासाठी खगोलशास्त्रज्ञांना अवकाश दुर्बिणीवर अधिक अवलंबून राहावे लागणार आहे.
50 हजार जणांच्या निरीक्षणावर आधारित अभ्यास
जेएफझेड जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसाइन्सेसचे भौतिकशास्त्रज्ञ क्रिस्टोफर कायबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जगभरातील सुमारे 50,000 नागरिक वैज्ञानिकांच्या निरीक्षणांवर आधारित हा अभ्यास केला आहे. या शास्त्रज्ञांनी त्यांना दिसणाऱ्या आकाशातील तार्यांची दृश्यांची तुलना केली असून तार्यांचा नकाशा तयार केला आहे. ज्यातून प्रकाश प्रदूषणाचे विविध स्तर पाहिले गेलेत.
तर, आकाशात तारे कमी दिसतील
2011 ते 2022 या काळात रात्रीचं आकाश सुमारे 7 ते 10 टक्क्यांनी अधिक प्रकाशमान झाल्याचं संशोधकांना आढळलं. याचा अर्थ आकाशाची चमक आठ वर्षांपेक्षा कमी कालावधीत दुप्पट झाली आहे, आणि गेल्या 18 वर्षांत चार पटीनं वाढली आहे. संशोधकांचा असा अंदाज आहे की, एखादा मूल जन्माला आल्यानंतर त्यावेळी जर आकाशात 250 तारे दिसत असतील, तर त्याच मुलाला शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शंभरपेक्षा कमी तारे दिसू शकतील.
प्रकाश प्रदूषणाला एलईडी अधिक जबाबदार
संशोधकांना वाटते की, वेगानं वाढणाऱ्या प्रकाश प्रदूषणाचं कारण म्हणजे आधुनिक एलईडी आहेत. हे एलईडी जुन्या बल्बपेक्षा जास्त प्रकाश देण्याचं काम करतात. जगभरातील आकाशातील प्रकाश मोजणारे उपग्रह देखील एलईडीद्वारे उत्सर्जित होणाऱ्या निळा प्रकाश मोजण्यास अडचणीचा सामना करतात. कारण ते 500 नॅनोमीटर तरंग लांबीचा प्रकाश पाहू शकत नाहीत, जो वातावरणात सहजपणे विखुरला जातो, आणि अधिक अस्पष्टता निर्माण करतो.
हा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, उत्तर अमेरिकेत रात्रीचा प्रकाश 10.4 टक्के वार्षिक दरानं वाढत असून युरोपमध्ये तो 6.5 टक्के वार्षिक दरानं वाढत आहे. उर्वरित जगामध्ये, रात्रीच्या प्रकाशाचा दर वार्षिक 7.7 टक्के दरानं वाढत आहे. 2012 ते 2016 दरम्यान रात्रीच्या वेळेचा प्रकाश वार्षिक 2.2 टक्के दरानं वाढल्याचा उपग्रहाचा अंदाज आहे. नागरी निरिक्षणांनाही त्यांची मर्यादा असली, तरी प्रकाश प्रदूषण झपाट्यानं वाढत आहे, यात शंका नाही आणि ही चिंतेची बाब आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.