नवी दिल्ली 09 एप्रिल : कोरोनाच्या प्रसाराचं देशभरातलं (Corona Pandemic)प्रमाण सध्या अत्यंत वेगानं वाढत आहे. त्यामुळे सेलेब्रिटीज, उद्योगपती आदी मंडळी पुन्हा एकदा लोकांना स्वच्छतेचे, सोशल डिस्टन्सिंगचे मूलभूत नियम पाळण्याचं आवाहन करत आहेत. बुधवारपर्यंत (सात एप्रिल) भारतातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 कोटी 28 लाख 1 हजार 785 झाली असून 1 लाख 66 हजार177 जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर महिंद्रा ग्रुपचे (Mahindra Group)अध्यक्ष आनंद महिंद्रा(Anand Mahindra)यांनी ट्विटरवर त्यांचे विचार व्यक्त केले आहेत. कोरोनाला प्रतिबंध करण्याचे साधे नियमही लोक कसे पायदळी तुडवत आहेत ,हे त्यांनी एक व्हायरल फोटो शेअर करून दाखवून दिलं आहे. महिंद्रा यांनी शेअर केलेल्या फोटोत असं दिसत आहे, की एक मनुष्य काचेच्या काउंटरवर असलेल्या वर्तुळाकृती जागेतून आत डोकावून आतल्या व्यक्तीशी बोलत आहे. काचेच्या पलीकडच्या बाजूला अनेक कर्मचारी काम करत असल्याचं दिसत आहे. कर्मचारी आणि बाहेरील व्यक्तींचा थेट संपर्क येऊ नये म्हणून काउंटरवर मध्यभागी काच बसवण्यात आली आहे, पण संबंधित व्यक्ती त्यातून आत डोकावत असल्यामुळे मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे. त्याहून पुढची गोष्ट म्हणजे आत डोकावणाऱ्या या व्यक्तीनं मास्कही घातलेला दिसत नाहीये. हा फोटो एखाद्या सरकारी कार्यलयातला असावा, असं वाटत आहे. ‘आपण माणसं सोशल डिस्टन्सिंगला (Social Distancing) सरावलेलो नाही, पण हीच वेळ आहे ते करण्याची. डोकं मागे घ्या आणि तोंडाला मास्क लावा,’ असं या फोटोच्या कॅप्शनमध्ये महिंद्रा यांनी लिहिलं आहे. हे ट्विट साडेदहा हजारांहून अधिक व्यक्तींनी लाईक केलं असून 850हून अधिक जणांनी ते रिट्विट केलं आहे. या ट्विटवर कमेंट करताना एका युझरने म्हटलं आहे, की कोरोनाबाधितांच्या संख्येत देशभरात दररोज अनेक रुग्णांची भर पडत असतानाही पश्चिम बंगाल, आसामसारख्या राज्यांत निवडणूक प्रचारसभा सुरूच आहेत. गुरुवारी आठ एप्रिल रोजी देशात एक लाख 26 हजार 789नवे कोरोनाबाधित सापडले.
Clearly, we’re not accustomed to social distancing. But it’s time to do our bit: pull our heads back and mask up! pic.twitter.com/cqK9apinMq
— anand mahindra (@anandmahindra) April 7, 2021
दुसऱ्या एका युझरनेही महिंद्रा यांच्याशी सहमती दर्शवली आहे. ‘अशा कठीण परिस्थितीत एकमेकांवर दोषारोप करण्यापेक्षा कन्फ्युशियस या चिनी तत्त्वज्ञाचं तत्त्वज्ञान अंमलात आणण्याची गरज आहे. कन्फ्युशियस म्हणतो, की काळोखाला दोष देण्यापेक्षा मेणबत्ती प्रज्वलित करणं चांगलं. तसंच आत्ता करण्याची गरज आहे. आपण कदाचित जग बदलू शकत नाही, पण आपण आपल्यात सुधारणा करू शकतो,’ असं त्या युझरने लिहिलं आहे. त्यामुळे कोणीही कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. घराबाहेर पडायची वेळ आल्यास मास्क नीट घालावा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं. सॅनिटायझरचा वापर करावा किंवा हात वेळोवेळी स्वच्छ धुवावेत. (Covid Appropriate Behaviour)