मुंबई, 21 जुलै: अनेक श्रीमंत लोकांना मोटारींचा शौक असतो. जगभरातील उंची, अलिशान ब्रँडच्या गाड्या त्यांच्या संग्रहात असतात. काही लोकांना मात्र फक्त अलिशान कार (Luxury car) असणं पुरेसं ठरत नाही. त्यांना अतिशय महाग किमतीची गाडी आपल्याकडे असणं, त्यातही काहीतरी वेगळं सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारं असणं महत्त्वाचं वाटतं. अनेकांना आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करणं, भपका दाखवणं आवडतं. असे लोक काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात. याचच एक उदाहरण म्हणजे ही एक सोन्याची फेरारी. सोन्याची ही चमकदार कार रस्त्यावरून जाताना नक्कीच अनेकांचे लक्ष वेधून घेते आहे. एका सोन्यात मढवलेल्या जगप्रसिद्ध इटालियन लक्झरी स्पोर्ट्स कार फेरारीचा (Ferrari) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
यात एक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी आपली ही सुपर कार दाखवत असल्याचे दिसत आहे. ही सोन्याची फेरारी बघून अनेक लोकांनी तिचे फोटो आणि व्हिडीओ घेण्यासाठी गर्दी केलेली दिसत आहे. लोक उत्साहानं या गाडीचे फोटो, व्हिडीओ काढत आहेत. ‘भारतीय-अमेरिकन व्यक्तीची सोन्याची फेरारी कार’ अशा नावानं हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओनं देशातील प्रख्यात उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांचंही लक्ष वेधून घेतलं. ट्रेंडिंग विषयांवरील प्रतिक्रियांसाठी ओळखले जाणारे आनंद महिंद्रा नेहमीच आपल्या सोशल मीडियावर सक्रीय असतात आणि आपल्या मार्मिक प्रतिक्रिया देत असतात.
हे वाचा-VIDEO: टोलपासून वाचण्यासाठी घेतला शॉर्टकट; मालगाडीच्या धडकेत वाहनाचा चुराडा
देशातील वाहन उद्योग क्षेत्रातील (Automobile Industry) आघाडीची कंपनी असलेल्या महिंद्रा आणि महिंद्रा समुहाचे अध्यक्ष असलेले आनंद महिंद्र यांनी या सोन्याच्या फेरारीच्या व्हिडीओबाबत ट्विटरवर आपली मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे. 'हा व्हिडीओ सोशल मीडियावर का व्हायरल होत आहे, हा व्हिडीओ केवळ श्रीमंत असलात तरी आपला पैसा कसा खर्च करू नये याचं हे उत्तम उदाहरण आहे.' अशी टिप्पणी त्यांनी केली आहे. त्यांची ही टिपण्णी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून, त्यांच्या या पोस्टला एक लाख 69 हजार 300 पेक्षा जास्त व्ह्यूज आणि 7 हजार लाईक्स मिळाल्या आहेत.
I don’t know why this is going around on social media unless it is a lesson on how NOT to spend your money when you are wealthy… pic.twitter.com/0cpDRSZpnI
— anand mahindra (@anandmahindra) July 19, 2021
अनेक युझर्सनी महिंद्रा यांच्या पोस्टला सहमती दर्शवली आहे, तर काहींनी ही कार सोन्याची नसून तिला सोन्याचे विनाइल रॅपिंग लावण्यात आल्याचं म्हटलं आहे. अनेक युझर्सनी वेगवेगळ्या देशातील अशा सोन्याचे विनाइल रॅपिंग लावलेल्या कार्सचे फोटो आणि व्हिडिओही शेअर केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anand mahindra, Live video viral