नवी दिल्ली 09 जुलै : कोरोनाचा परिणाम (Coronavirus) संपूर्ण जगावरच झाला. मात्र, जे लोक आधीच गरीबी आणि दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष करत होते, त्यांच्यावर याचा सर्वाधिक परिणाम झाला. गरीबीच्या आकड्यांचं विश्लेषण करणारी आंतरराष्ट्रीय संघटना ऑक्सफॅमचं (Oxfam) म्हणणं आहे, की दर मिनिटाला उपासमारीमुळे 11 लोकांचा मृत्यू (Deaths Due to Starvation) होतो. जगभरात या परिस्थितीचा सामना करणाऱ्या लोकांच्या संख्येत मागील वर्षीच्या तुलनेत सहा पटीनं वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत उपासमारीचा सामना करणाऱ्या लोकांच्या संख्येत दोन कोटीनं वाढ झाली आहे. कोरोना महामारीच्या काळातील आर्थिक संकटामुळे अनेकांच्या जीवनावर याचा परिणाम झाला आहे. ऑक्सफॅमनं गुरुवारी “द हंगर व्हायरस मल्टीप्लाईज” नावाच्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं, की उपासमारीमुळे मृत्यू होणाऱ्य़ांची संख्या कोरोनानं होणाऱ्या मृत्यूपेक्षाही अधिक आहे. दर मिनिटाला तब्बल सात लोकांचा भूकेमुळे मृत्यू होत आहे. ऑक्सफॅम अमेरिकाचे अध्यक्ष आणि सीईओ एबी मॅक्समॅन यांनी सांगितलं, की हे आकडे हैराण करणारा आहे. या समस्येचा सामना करणारा एक व्यक्तीदेखील खूप आहे, असंही ते म्हणाले. संघटनेनं असंही म्हटलं, की जगभरात 15.5 कोटी लोक असे आहेत ज्यांच्याकडे अन्न सुरक्षा नाही आणि काहींची परिस्थिती तर यापेक्षाही वाईट आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अशा लोकांच्या संख्येत सुमारे 2 कोटीनं वाढ झाली आहे. महामारीचा सामना करण्याऐवजी लोक एकमेकांसोबत लढत आहेत, अनेक देशांच्या सैन्यात संघर्ष सुरू आहे. ऑक्सफॅमच्या म्हणण्यानुसार, महामारीच्या काळात जगभरातील सैन्याच्या खर्चात 51 बिलियन डॉलरनं वाढ झाली. रिपोर्टमध्ये अफगानिस्तान, इथोपिया, दक्षिण सूदान, सीरिया आणि यमन यांच्यासह काही देशांना सर्वाधिक खराब अवस्था असलेले उपासमारीचे हॉटस्पॉट म्हटलं गेलं आहे. मात्र, हे सर्व युद्धात व्यग्र आहेत. याचदरम्यान ग्लोबल वार्मिंग आणि महामारीच्या आर्थिक परिणामांमुळे खाद्याच्या किमतीतही 40 टक्के वाढ झाली आहे. जी एका दशकातील सर्वाधिक आहे. रिपोर्टनुसार, याच कारणामुळे लाखो लोकांना उपासमारीमुळे आपला जीव गमवावा लागत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.