नवी दिल्ली 08 जून : मुलं कधी कधी अशा गोष्टी करतात की ते पाहूनच कोणीही थक्क होतं. अशीच एक बातमी अमेरिकेतून समोर आली आहे. कल्पना करा की एक 10 वर्षांचा मुलगा SUV घेऊन सुपरफास्ट हायवेवर जात आहे. गाडीचा वेग आणि त्यातील लहान मूल पाहून लोकांनी पोलिसांना फोन केल्यावर हा मुलगा गाडी वेगाने पळवू लागला. मात्र, पोलिसांनी त्याला पकडलं, चौकशी केली असता त्याचं उत्तर ऐकून पोलीसही चक्रावून गेले. ही घटना अमेरिकेतील मिशिगनमधील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुलाला डेट्रॉईटमध्ये त्याच्या आईकडे जायचे होते. अनेकवेळा प्रयत्न केला पण त्याला कोणीही आईकडे नेलं नाही. यानंतर त्याने आईला भेटण्याचा वेगळा मार्ग शोधला. घरात पार्क केलेली आईची गाडी चोरून तो हायवेवर निघाला. हायवेवर गाडी विचित्रपणे धावत असताना लोकांना संशय आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पाठलाग सुरू केला.
पोलिसांनी आधी त्याला थांबायला सांगितलं, पण तो घाबरला आणि वेगाने गाडी चालवू लागला. यानंतर पोलिसांनीही चालकाचा पाठलाग करून त्याला पकडण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्याची कार रेलिंगला धडकली. पोलीस जवळ पोहोचले तेव्हा आत बसलेला चालक पाहून त्यांना धक्काच बसला. कारण, गाडी कोणी मद्यधुंद व्यक्ती चालवत नव्हता तर एक 10 वर्षांचा मुलगा चालवत होता. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
The Trooper was behind the suspect for about a mile with lights & sirens activated while OnStar disabled the Buick, allowing for a safe stop. Thankfully, nobody was injured in this incident. Note: there is no sound in this video. pic.twitter.com/nqSwdpm4eI
— MSP Third District (@mspbayregion) June 2, 2023
मुलाला विचारणा केली असता त्याने दिलेलं उत्तर थक्क करणारं होतं. आपण आईला भेटायला जात असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. तेथे पोहोचण्याचं कोणतंही साधन नसल्याने त्याने कार चोरली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हे मूल विचित्र पद्धतीने एसयूव्ही चालवताना दिसत आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं.