पाकिस्तान, 16 मार्च :पाकिस्तानमध्ये (Pakistan) हिंदूंची मंदिरे (Hindu Temples), संत महात्म्यांच्या समाध्या यावर वारंवार हल्ले केले जातात. दिवसेंदिवस इथल्या हिंदू मंदिरांची (Attack on Hindu mandir in Pakistan) स्थिती बिकट होत चालली आहे. त्यांना सरकारचेही संरक्षण लाभत नाही. याबाबतीत नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या एका अहवालात इम्रान खान (Imran Khan) याच्या सरकारच्या काळात असे हल्ले वाढल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. दरम्यान, पाकिस्तान सरकारनं मात्र हिंदू आणि मुस्लीम समाजातील तेढ दूर झाल्याचं म्हटलं आहे.
डिसेंबर 2020मध्ये खैबर पख्तुनख्वा (Khyber Pakhtunkhwa) भागातील करक जिल्ह्यातील परमहंस स्वामी अद्वैतानंद (Swami Adwaitanand) यांच्या समाधीवर कट्टरपंथी लोकांनी हल्ला केला. त्या आधीही या समाधीस्थळाचे आणि आसपासच्या मंदिरांवर हल्ले करण्यात आले होते. या आधी 1997 मध्येही हे स्थळ संपूर्णपणे फोडून टाकण्यात आलं होतं. मात्र हिंदूंनी केलेल्या मागणीमुळे अखेर 2015 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं याच्या पुनर्निमाणाची परवानगी दिली.
या समाधीस्थळाची तोडफोड करणाऱ्या स्थानिक मुसलमानांचे म्हणणे होते की या जागेवर त्यांच्यासाठी घरं बांधली पाहिजेत. हे प्रकरण तापायला लागलं तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं स्वतःच पुढाकार घेऊन या ठिकाणी मंदिर, समाधी पुन्हा उभारण्यास परवानगी दिली, मात्र त्याचवेळी हिंदू या टेरी (Teri) भागात कधीही आपल्या धर्माचा प्रचार -प्रसार करणार नाहीत. ते इथं एकत्र जमून प्रार्थना करू शकतील पण मोठ्या संख्येनं एकत्र येण्यास आणि इथं कोणतंही भव्य बांधकाम करता येणार नाही ही अटही घातली. या शिवाय हिंदू लोक या भागात जमीन खरेदी करू शकणार नाहीत. समाधीस्थळापर्यंतच त्यांचे क्षेत्र मर्यादित असेल, अशाही अटी होत्या.
स्वामी परमहंस अद्वैतानंद कोण होते?
वारंवार ज्यांच्या समाधिस्थळावर हल्ले होतात ती समाधी आहे स्वामी परमहंस स्वामी अद्वैतानंद यांची. जगभरात यांचे अनुयायी आहेत, पण भारतात मात्र फार कमी माहिती आहे. परमहंस स्वामी अदैवातानंद यांचा जन्म 1846मध्ये बिहारमधील छपरा या गावात झाला होता. 16 व्या वर्षीच ते घर सोडून अध्यात्माच्या शोधार्थ निघाले. संन्यासाचा प्रचार-प्रसार करत देशभर ते फिरत होते. या काळात भारत-पाकिस्तान फाळणी झाली नव्हती. त्यामुळे आता पाकिस्तानात असलेलं टेरी तेव्हा हिंदुस्थानात होतं. स्वामी अदैवातानंद टेरी इथं पोहोचले. इथंच त्यांना अध्यात्मिक ताकदीची प्रचिती आली. त्यामुळं त्यांनी आपल्या मृत्यूनंतर आपली समाधी इथंच बनवावी अशी इच्छा व्यक्त केली. 100 वर्षांपूर्वी ते इथं राहत असताना एक मंदिर बनवण्यात आलं, तर त्यांच्या मृत्यूनंतर 1919 मध्ये त्यांची समाधीही उभारण्यात आली. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर मात्र यावरून वादविवाद होऊ लागले. हेच मंदिर नव्हे तर अन्य मंदिरांवरही सतत हल्ले होत असतात.
(हे वाचा: मोठी बातमी! दहशतवादी आरिज खानला फाशीची शिक्षा, दिल्ली कोर्टाचा निर्णय)
पाकिस्तानमधील द डॉन या वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, या संदर्भात एक सदस्यीय आयोगानं तयार केलेला अहवाल 5 फेब्रुवारी 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाकडे सादर करण्यात आला. यानुसार, अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्थळांच्या देखभालीसाठी जबाबदार इक्विटी ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड (Equity Trust Property Board) आपलं काम करण्यात अपयशी ठरलं आहे. पाकिस्तानात एकंदर 365 मंदिरं आहेत.यापैकी केवळ 13 मंदिरांची देखभाल केली जाते. तर 65 धार्मिकस्थळांचा हक्क हिंदू समाजाकडं आहे. उर्वरीत 287 धार्मिक स्थळं जमीन माफियांकडं आहेत. अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्थळांचे संवर्धन करण्यात इक्विटी ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड अयशस्वी ठरलं असून, अल्पसंख्याकांची संपत्ती हडपण्याकडच त्याचं लक्ष असल्याचा आरोप या अहवालात करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.