मराठी बातम्या /बातम्या /विदेश /ब्रिटनच्या प्रिन्सवर बलात्काराचा आरोप करणारी Virginia पुन्हा एकदा चर्चेत, Donald Trump यांच्याशी आहे असं कनेक्शन

ब्रिटनच्या प्रिन्सवर बलात्काराचा आरोप करणारी Virginia पुन्हा एकदा चर्चेत, Donald Trump यांच्याशी आहे असं कनेक्शन

व्हर्जिनिया आणि मॅक्सवेलसह प्रिन्स अँड्र्यू- फोटो AFP ने जारी केला आहे

व्हर्जिनिया आणि मॅक्सवेलसह प्रिन्स अँड्र्यू- फोटो AFP ने जारी केला आहे

प्रिन्स अ‍ॅन्ड्र्यू (Prince Andrew) हे ब्रिटनचे (Britain) राजकुमार आहेत. त्यांच्यावर 2015 मध्ये व्हर्जिनिया ज्यूफ्री (Virginia Giuffre) नावाच्या मुलीनं बलात्काराचा आरोप केला होता.

    लंडन, 17 फेब्रुवारी: प्रिन्स अ‍ॅन्ड्र्यू (Prince Andrew) हे ब्रिटनचे (Britain) राजकुमार आहेत. त्यांच्यावर 2015 मध्ये व्हर्जिनिया ज्यूफ्री (Virginia Giuffre) नावाच्या मुलीनं बलात्काराचा आरोप केला होता. 'जेव्हा मी फक्त 17 वर्षांची होते, तेव्हा प्रिन्स अ‍ॅन्ड्र्यू यांनी त्यांच्या काही मित्रांसह माझ्यासोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले होते,' असं व्हर्जिनिया ज्यूफ्रीनं सांगितलं. या आरोपांच्या आधारे व्हर्जिनियाने न्यायालयातदेखील खटला दाखल केला होता. यानंतर ब्रिटनमध्ये एकच खळबळ उडाली होती. कारण ज्या व्यक्तीवर हे आरोप करण्यात आले होते, ती व्यक्ती ब्रिटनच्या राजघराण्यातली होती. हे प्रकरण या घराण्याच्या प्रतिष्ठेशी संबंधित होते. प्रिन्स अ‍ॅन्ड्र्यू यांनी सुरुवातीला हे आरोप फेटाळले होते. मात्र संशयाला पुष्टी मिळाल्यानंतर शाही जबाबदाऱ्यांमधून त्याला मुक्त करण्यात आलं होतं. यानंतर आता पुन्हा एकदा व्हर्जिनिया ज्यूफ्री आणि प्रिन्स अ‍ॅन्ड्र्यु यांच्याशी संबंधित हे प्रकरण चर्चेत आलं आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

    आता या प्रकरणात काय झालं आहे?

    याबाबत प्रिन्स अ‍ॅन्ड्र्यू यांनी मंगळवारी (15 फेब्रुवारी 22) एक निवेदन जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी लैंगिक गैरवर्तनाचा आरोप करणाऱ्या व्हर्जिनिया ज्यूफ्रीसोबत न्यायालयाबाहेर समझोता करण्याविषयी म्हटलं आहे. त्यांच्या वकिलांनी सांगितलं की, 'या करारांतर्गत ड्यूक ऑफ यॉर्क व्हर्जिनियाला एक ठराविक रक्कम (किती, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही) देतील. व्हर्जिनिया देहव्यापरासाठी ओलीस ठेवून खरेदी-विक्री करणाऱ्या मुला-मुलींच्या कल्याणासाठीही काम करते. प्रिन्स अ‍ॅन्ड्र्यू तिच्या या सेवाभावी कामासाठीही पैसे देणार आहेत.'

    हे वाचा-Fake Porn बनवण्यासाठी वापरलं जातंय भयंकर तंत्रज्ञान, सेलेब्सही झालेत याचे शिकार

    त्यांच्या वकिलांनी पुढे सांगितले की, 'प्रिन्स अ‍ॅन्ड्र्यू यांचा कधीही व्हर्जिनियाच्या चारित्र्याला कलंकित करण्याचा हेतू नव्हता. उलट, व्हर्जिनियाला दुहेरी त्रास सहन करावा लागला, असं त्यांना वाटतं. एकीकडे ती लैंगिक छळाची बळी ठरली. दुसरीकडे, हे प्रकरण उघडकीस आणल्याने तिला जाहीर टीकेला सामोरं जावं लागलं. व्हर्जिनिया तिच्यासाठी आणि तिच्यासारख्या इतर पीडितांसाठी उभी राहिली. तिने त्यांच्यासाठी आवाज उठवला, लढा दिला याचे प्रिन्स अ‍ॅन्ड्र्यू यांना कौतुक आहे. यासोबतच प्रिन्स अ‍ॅन्ड्र्यू यांनी जेफ्री एपस्टिनसोबतच्या नात्याबद्दल खेद व्यक्त केला आहे.'

    जेफ्री एपस्टिन मध्येच कोठून आला?

    प्रिन्स अ‍ॅन्ड्र्यू यांच्या निवेदनात ज्या जेफ्री एपस्टिनचा (Jeffrey Epstein) संदर्भ आला आहे, तो खरं तर या संपूर्ण वादाच्या मुळाशी आहे. मुळचा अमेरिकी नागरिक असलेला जेफ्री हा लैंगिक गुन्ह्यांमधला कुख्यात गुन्हेगार आहे. तो अमेरिका, ब्रिटन आदी देशांमध्ये देहविक्रीसाठी मुला-मुलींच्या खरेदी-विक्रीचे (Sex Trafficking) काम करत असे. तो प्रिन्स अ‍ॅन्ड्र्यू यांचा मित्र होता. त्यावेळी एपस्टिन सहायक मॅक्सवेलने (Maxwell) व्हर्जिनियाला लैंगिक गुलाम (Sex-Slave) म्हणून विकत घेतले होते. त्यावेळी व्हर्जिनियाचे वय केवळ 14 वर्षं होतं. यापैकी एपस्टिन नंतर पकडला गेला आणि त्याने 2019 मध्ये तुरुंगात त्याने आत्महत्या केली. मॅक्सवेलला दोन वर्षानंतर, 2021 मध्ये देहव्यापारासाठी अल्पवयीन मुलांची तस्करीसह अनेक आरोपांमध्ये दोषी ठरवण्यात आले असून मॅक्सवेल सध्या तुरुंगात आहे.

    हे वाचा-पालकांनीच चिमुकलीचं अपहरण करून 2 वर्ष घरातील पायऱ्यांखाली ठेवलं; कारण समोर

    व्हर्जिनियासोबत ही घटना केव्हा घडली

    2001मध्ये ती 17 वर्षांची असताना प्रिन्स अ‍ॅन्ड्र्यू, एपस्टिन आणि त्यांच्या साथीदारांनी तिचा लैंगिक छळ केला, असं व्हर्जिनियाने स्वतः न्यायालयात प्रकरण दाखल करताना म्हटले होते. ही घटना मॅक्सवेलच्या लंडनमधल्या घरात घडली होती. यामुळे जखमी झालेल्या व्हर्जिनियाने 2009 मध्ये न्यायालयात केस दाखल केली होती. यामध्ये तिने प्रथम 'जेन डो 102' या टोपणनावाने केस दाखल केली. यात एपस्टिनला प्रमुख आरोपी बनवण्यात आले होते पण प्रिन्स अ‍ॅन्ड्र्यू यांचे नाव समाविष्ट नव्हते. त्यानंतर असे सांगण्यात आले की तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एपस्टिनच्या साथीदारांमध्ये राजघराण्यातील एक सदस्यही होता. तथापि, व्हर्जिनियाने नंतर धैर्य दाखवत प्रिन्स अ‍ॅन्ड्र्यू यांचे नाव आरोपी म्हणून उघडपणे घेतले. एवढेच नाही तर 2021 मध्ये तिने थेट प्रिन्स अ‍ॅन्ड्र्यूविरुद्ध न्यायालयात दावाही दाखल केला.

    डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतही जोडलं गेलं व्हर्जिनियाचं नाव

    व्हर्जिनिया सध्या 38 वर्षाची आहे. ऑस्ट्रेलियन नागरिक रॉबर्ट जेफ्रीसोबत विवाह केल्यानंतर ती ऑस्ट्रेलियात (Australia) राहत आहे. तिचा जन्म 1983 मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे झाला. तिची कौटुंबिक स्थिती फारशी चांगली नव्हती. या स्थितीला कंटाळून तिनं लहानपणीच घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. तिला अनेक रात्री फूटपाथवर काढव्या लागल्या होत्या. अमेरिकेचे मोठे उद्योगपती आणि नंतर अमेरिकेचे राष्ट्रपती बनलेल्या डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या घरातील स्पा सेंटरमध्ये व्हर्जिनियाने काही काळ नोकरी केली होती. यावेळी तिची ओळख ब्रिटिश नागरिक मॅक्सवेलशी झाली. त्याने तिला एपस्टिनच्या घरी नोकरी मिळवून दिली.

    हे वाचा-इथले लोक घरातच ठेवतात जवळच्या व्यक्तींचे मृतदेह; दररोज दिलं जात गरमागरम जेवण

    आता प्रिन्स अ‍ॅण्ड्र्यू यांच्यासमोर नेमका कोणता पर्याय आहे

    व्हर्जिनियाने प्रिन्स अ‍ॅन्ड्र्यू यांच्याविरोधात दाखल केलेल्या खटल्याची पुढील महिन्यात सुनावणी होणार आहे. त्यांनी त्यापूर्वीच त्यांच्यावतीने करारनामा न्यायालयात सादर केला आहे. व्हर्जिनिया या करारनाम्याचा स्वीकार करू शकते, असं जाणकारांचं मत आहे. यामुळे प्रिन्स अ‍ॅन्ड्र्यू न्यायालयीन कारवाई टाळू शकतात. मात्र, अद्याप त्यांनी आपल्यावरील आरोप मान्य केलेले नाहीत. पण देहव्यापारातील पीडितांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. या कामात व्हर्जिनियाला आर्थिक पाठबळ देण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे. परंतु, हे सर्व असूनही प्रिन्स अ‍ॅन्ड्र्यू नजीकच्या भविष्यात सार्वजनिक जीवनातील आपला दर्जा परत मिळवू शकतील, अशी शक्यता कमीच मानली जाते.

    First published:
    top videos

      Tags: Britain, Donald Trump