वॉशिंग्टन, 30 सप्टेंबर : जगावर कोरोनाचं संकट असताना अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असून, सध्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडन अशी टक्कर होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या चार वर्षांच्या कारकिर्दीत अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. ‘माझा पराभव झाल्यास मी लवकर सत्ता सोडणार नाही, असं विधान त्यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यामुळं असं घडल्यास काय परिणाम होऊ शकतात यावर एक नजर टाकूया. ‘16 सप्टेंबर रोजी व्हाइट हाउसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक हरलो, तर सहजासहजी सत्ता हस्तांतरित करणार नाही,’ असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं. पोस्टाद्वारे होणार्या मतदानावर शंका असल्यामुळे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल सर्वोच्च न्यायालयातही पोहोचू शकतो, असंही ते म्हणाले. याच विषयाबद्दल अधिक प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावर ट्रम्प भडकले आणि प्रश्नाचं उत्तर देणं देखील टाळलं. यावर विरोधी उमेदवार जो बायडन यांनी टीका करत ही हुकूमशाही असल्याचं म्हटलं आहे. यावर विधितज्ज्ञ लॉरेन्स डग्लस यांनी एक पुस्तक देखील लिहिलं आहे. “Will He Go?” असे या पुस्तकाचं नाव आहे. यामध्ये संविधानातील त्रुटींवर नजर टाकण्यात आली आहे. संविधानामध्ये यासाठी कोणताही कायदा नसून आजपर्यंत अमेरिकेमध्ये असं कधीही घडलेलं नाही. सत्ता सोडण्यास नकार दिला तर काय होईल? अमेरिकन संविधानामध्ये यासाठी कोणताही कायदा नाही. विधितज्ज्ञ लॉरेन्स यांनी याविषयी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे की, ‘अमेरिकेच्या संविधानात शांततेने सत्ता सोडण्यासाठी कोणताही कायदा नाही. यामध्ये केवळ शांततेनी सत्ता सोडण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मात्र जर एखाद्या राष्ट्राध्यक्षांनी सत्ता सोडायलाच नकार दिला तर भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते असं देखल त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता ट्रम्प नक्की काय करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हे ही वाचा- भारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा ट्रम्प यांना पोस्टाने होणार्या मतदानाबाबत शंका आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार होणार असल्याची शंका त्यांनी अनेकवेळा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता कोरोनाच्या या संकटात असं काही घडल्यास अमेरिकेत काय परिस्थिती निर्माण होते आणि ट्रम्प काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.