Home /News /videsh /

भारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा

भारताने Covid-19 मृत्यूचे खरे आकडे जाहीर केलेले नाहीत ; ट्रम्प यांचा नवा दावा

अमेरिकेत Coronavirus चे सर्वाधिक रुग्ण आहेत. जगात सर्वात जास्त Covid मृत्यूही अमेरिकेत झाले आहेत. पण स्वतःची बाजू उचलून धरण्यासाठी अमेरिकन अध्यक्षांनी आता भारताकडे बोट दाखवलं आहे.

    वॉशिंग्टन, 30 सप्टेंबर : भारतात Coronavirus मुळे किती जण बाधित झाले आणि किती मृत्यू झाले याचे आकडे संशयास्पद आहेत, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी केला. TV डिबेटमध्ये स्वतःची बाजू मांडताना त्यांनी भारतासारख्या देशाला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेत Coronavirus चे आतापर्यंतचे सर्वाधिक बळी गेले आहेत आणि कोरोना रुग्णांची जगात सर्वाधिक संख्या अमेरिकेतच आहे. त्याखालोखाल कोरोनारुग्णांची संख्या भारतात आहे. पण भारतात Covid-19 मृत्यूंचं प्रमाण अमेरिकेच्या तुलनेत खूपच कमी आहे. यावरून ट्रम्प यांना प्रश्न विचारले गेले. त्या वेळी भारत, चीन, रशिया या देशांनी दाखवलेली कोरोनारुग्ण आणि कोरोना मृत्यूंच्या संख्येवर ट्रम्प यांनी शंका व्यक्त केली. "तुम्ही आकड्यांविषयी बोलता, तेव्हा चीनमध्ये, रशियामध्ये नेमके किती जण मृत्युमुखी पडले हे तुम्हाला माहीत नसतं. तुम्हाला हेही माहीत नाही की भारतात कोरोनाने किती जणांचा बळी घेतला", क्लेव्हलँडध्ये एका जाहीर चर्चेच्या कार्यक्रमात ट्रम्प यांनी भारतावर खरे कोविड आकडे लपवल्याचा आरोप केला. भारतात कोविड मृत्यूदर अमेरिकेपेक्षा कमी राहिलेला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनाने 2 लाखांहून अधिक लोकांचा जीव गेला आहे. भारतात ही संख्या एक लाखाच्या आत आहे. Covid-19 ची साथ आटोक्यात का ठेवता आली नाही, असा जाहीर प्रश्न विचारल्यावर ट्रम्प यांनी थेट भारताचं नाव घेत खोटं ठरवायचा प्रयत्न केला. अमेरिकेची कोविड आकडेवारी खरी आहे. भारत जे आकडे दाखवतोय त्याहून अधिक कोरोना मृत्यू तिथे झाल्याची शक्यता असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. अमेरिकेत सध्या अध्यक्षीय निवडणुकीचे (US presidential election 2020) वारे वाहात आहेत. त्याच्या प्रचारासाठीच दोन अध्यक्षीय उमेदवारांच्या जाहीर चर्चेचा आणि वादविवादाचा (Debate)कार्यक्रम क्लेव्हलँडमध्ये होता. त्या वेळी ट्रम्प यांचे अध्यक्षीय निवडणुकीतले प्रतिस्पर्धी उमेदवार जो बिडेन यांनी ट्रम्प यांच्यावर coronavirus साथीच्या काळात ढिसाळ नियोजन केल्याचा आरोप करत, त्यांच्या नेतृत्वावर अनेक थेट प्रश्न उभे केले. जो बिडन यांच्या आरोपांना उत्तर देताना ट्रम्प यांनी स्वतःची बाजू उचलून धरत सांगितलं की, "मी काहीच काम केलं नसतं तर अमेरिकेत मृत्यूंची संख्या लाखोंनी वाढली असती. चीनसारख्या देशाने सुरुवातीच्या काळात या साथीच्या आजाराला लपवायचा प्रयत्न केला, त्याची शिक्षा जग भोगत आहे." अमेरिकन नेतेमंडळी Coronavirus चे आकडे लपवल्याची शंका चीन आणि रशियाविषयी बोलून दाखवत असतात. पण प्रथमच भारताविषयी अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे. थेट अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच भारतातले कोविडचे आकडे शंकास्पद असल्याचं जाहीर चर्चेत म्हटलं आहे. कोरोनाची साथ सुरू व्हायच्या अगदी काही दिवस आधीच खूप गाजावाजा करत अमेरिकन अध्यक्ष आपल्या परिवारासह भारताच्या दौऱ्यावर आले होते. फेब्रुवारी अखेरीला हा बहुचर्चित ट्रम्प यांचा दौरा आटोपला आणि मार्चपासून जगभरात आणि विशेषतः अमेरिकेत कोरोनाचं थैमान सुरू झालं.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus, Donald Trump

    पुढील बातम्या