कीव, 11 मार्च : गेल्या 15 दिवसांपासून रशिया (Russian) युक्रेनवर (Ukraine) सातत्याने हल्ला करत आहे. रशियाच्या क्षेपणास्त्र (Missiles) आणि बॉम्बस्फोटांमुळे युक्रेन उद्ध्वस्त होत आहे. लाखो युक्रेनियन नागरिक युद्धामुळे निर्वासित झाले आहेत. युक्रेनमधील प्रमुख शहरं रशियाच्या हल्ल्यामुळे बेचिराख होण्याच्या मार्गावर आहेत. या युद्धामुळे युक्रेनमध्ये भयावह स्थिती निर्माण झाली आहे. रशियन सैन्याच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचं पाहायला मिळत आहे. बुधवारी ल्किवमधल्या एका मॅटर्निटी हॉस्पिटलवर (Maternity Hospital) रशियन सैन्याने हल्ला (Attack) केला. या हल्ल्यात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितलं की, ``अग्नेय भागातील मारियुपोल (Mariupol) या बंदर असलेल्या शहरातील मुलांचे रुग्णालय आणि प्रसूती केंद्राला रशियन सैन्यानं लक्ष्य केलं होतं. या हल्ल्यात मोठं नुकसान झालं आहे.`` युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी ट्विट करत या हल्ल्याचा निषेध केला आहे.
या रुग्णालयात नॅशनलिस्ट राहत होते का? गर्भवती महिला क्षेपणास्त्र डागणार होत्या का? या रुग्णालयातल्या व्यक्तींनी रशियन नागरिकांना नाराज केलं होतं का, असे प्रश्न युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, ``रशिया युक्रेनियन नागरिकांची कत्तल करत आहे आणि हॉस्पिटलवरील बॉम्ब हल्ला हा त्याचा पुरावा आहे. यावर तुम्ही असं म्हणू शकत नाही, की जे काय घडतंय ते आम्ही पाहिलंच नाही,`` असं त्यांनी युरोपियन युनियनलाही (European Union) या वेळी सुनावलं आहे.
``मारियुपोल येथील मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये रशियन सैन्याचा थेट हल्ला. लोक, मुले ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. अत्याचार. जग किती काळ या दहशतीकडे दुर्लक्ष करत राहणार? हवाई हल्ले, हत्या थांबवा. तुमच्याकडे सामर्थ्य आहे पण तुम्ही माणुसकी गमावत आहात,`` असं ट्विट राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी केलं आहे. `अनेक मुलं ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत,` असंही त्यांनी म्हटलं आहे.
या हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांच्या कुटुंबाचा शोध घेतला जात आहे, असं राष्ट्रपती कार्यालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
``युक्रेनियन नागरिक शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करतील. रशियन सैन्याला कोणत्याही परिस्थितीत युक्रेन सोडावं लागेल. रशियाला चर्चेतून हा प्रश्न सोडवावा, अशी ऑफर देण्यात आली होती. पण रशिया ती मान्य करायला तयार नाही. दुसरीकडे रशिया युक्रेनवर सातत्याने जोरदार हल्ले करत आहे. हे हल्ले रोखण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्याचं दिसत आहे,`` असं राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.