जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / सारख्या दिसत असल्यानं सोशल मीडियावर झाली मैत्री, दोघींना सत्य समजलं तेव्हा आनंद गगनात मावेना

सारख्या दिसत असल्यानं सोशल मीडियावर झाली मैत्री, दोघींना सत्य समजलं तेव्हा आनंद गगनात मावेना

सारख्या दिसत असल्यानं सोशल मीडियावर झाली मैत्री, दोघींना सत्य समजलं तेव्हा आनंद गगनात मावेना

दोन सारख्या दिसणाऱ्या मुलींची (Identical Twins) सोशल मीडियावर गाठ पडली. कालांतराने दोघींना कळलं की त्या दोघी जुळ्या बहिणी आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 11 मे : जुन्या हिंदी सिनेमांमध्ये आपण अनेकदा पाहिलेलं आहे, की जुळी भावंडं (Twins) लहानपणी कुंभमेळ्यात किंवा आणखी कोणत्या तरी मोठ्या सोहळ्यात हरवतात. त्यांना कोणी तरी वेगवेगळ्या ठिकाणी वाढवतं. मोठं झाल्यानंतर कधी तरी अचानक ती समोर येतात आणि मग सिनेमाच्या शेवटी ती भावंडं असल्याचं स्पष्ट होतं. अशा घटना प्रत्यक्ष आयुष्यात घडत नाहीत, अशी आपली धारणा असते. मात्र, चीनमध्ये अशी एक घटना वास्तवात घडल्याचं समोर आलं आहे. दोन सारख्या दिसणाऱ्या मुलींची (Identical Twins) सोशल मीडियावर गाठ पडली. कालांतराने दोघींना कळलं की त्या दोघी जुळ्या बहिणी आहेत. ‘टाइम्स नाऊ’च्या हवाल्याने नवभारत टाइम्सने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. चेंग केके (Cheng Keke) आणि झँगली (Zhang Li) अशी या दोघींची नावं आहेत. त्या दोघीही चीनच्या (China) झेंगझाऊमधल्या हेनान (Heinan) प्रांतात राहणाऱ्या आहेत. चेंग हिला Douyin या सोशल मीडिया साइटवर हुबेहूब आपल्यासारखी दिसणारी मुलगी सापडली. दोघींच्या सारख्या दिसण्यामुळे त्या एकमेकींशी बोलू लागल्या. दोघींमध्ये मैत्रीही झाली. काही दिवसांनी त्यांच्या लक्षात आलं, की आपल्या आवडी-निवडीही सारख्या आहेत. मार्च महिन्यात दोघी प्रत्यक्ष भेटल्या. त्यानंतर त्यांना जाणीव झाली, की त्या दोघी एकमेकींसारख्याच आहेत. दोघींचे विचार आणि विचार करण्याची पद्धतही एकसारखी आहे. त्यानंतर चेंगने आपल्या आई-वडिलांना याबद्दल सांगितलं. हुबेहूब आपल्यासारख्या दिसणाऱ्या मुलीला आपण भेटल्याचं तिने सांगितल्यावर तिच्या आई-वडिलांनी तिला सांगितलं, की तिला त्यांनी दत्तक घेतलं होतं. तोपर्यंत चेंगला हे माहितीच नव्हतं. चेंगनेही बातमी झँगलाही सांगितली. झँगच्या आईने सांगितलं, की या जुळ्या मुलींचा जन्म झाला, तेव्हा दोन मुलींचं पालनपोषण करण्याएवढी कुटुंबाची परिस्थिती नव्हती. म्हणून एका मुलीला तिने दत्तक द्यायचं ठरवलं. झँगच्या आईने तिला हेही सांगितलं, की ती दुसरी मुलगी आता कुठे आहे, याची तिला आता कल्पना नाही. त्यानंतर चेंगच्या कुटुंबीयांनी दोघींची डीएनए टेस्ट करायचा विचार केला. 29 एप्रिल रोजी डीएनए टेस्टच्या रिपोर्टवरून सिद्ध झालं, की चेंग आणि झँग या जुळ्या बहिणी आहेत. सिनेमात शोभावी अशी ही गोष्ट आपल्या खऱ्या आयुष्यात घडल्याने त्या दोघींना खूपच आनंद झाला. जन्मल्यानंतर त्या दोघी एकमेकींपासून दुरावल्या असल्या तरी सोशल मीडियाने या दोघींना पुन्हा जवळ आणलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात