Home /News /videsh /

ट्रम्प नंतर आता त्यांच्या जावयाच्या नावाची नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस; काय आहे कामगिरी?

ट्रम्प नंतर आता त्यांच्या जावयाच्या नावाची नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस; काय आहे कामगिरी?

डोनाल्ड ट्रम्प (Trump son in law) यांचे जावई जेराड कुशनर (Jared Kushner) यांच्या नावाची नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. काय आहे त्यांची अशी कामगिरी? वाचा

अमेरिका, 1 फेब्रुवारी  अमेरिकेतील व्हाइट हाउसचे माजी सीनिअर ॲडव्हायजर जेराड कुशनर (Jared Kushner) आणि डेप्युटी ॲडव्हायजर अवि बेर्कोविट्झ (Avi Berkowitz) यांची या वर्षीच्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. जेराड कुशनर हे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई आहेत. गेल्या वर्षी ट्रम्प यांचीच शिफारस शांतता पुरस्कारासाठी करण्यात आली होती. आता त्यांच्या जावयाचं नाव पुढे आलं आहे. त्यांची काय कामगिरी आहे त्याविषयी वाचा... इस्रायल आणि संयुक्त अरब अमिराती तसंच बहारीन या देशांनी ऑगस्ट 2020 मध्ये एका शांतता करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. या शांतता कराराला अबराम ॲकॉर्ड्स (Abraham Accords)  म्हटलं जातं. या करारासाठी अमेरिकेने मध्यस्थी केली होती. जागतिक शांततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या शांतता कराराला यशस्वी करण्यात कुशनर आणि अवि यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. हा करार झाला तेव्हा अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार होतं. कराराचं महत्त्व इस्रायल आणि अरब देशांमध्ये अनेक वर्षांपासून असलेल्या तणावाच्या वातावरणात हा करार होणं अत्यंत  महत्त्वाचं आहे. 25 वर्षांमध्ये अशी घटना घडली नव्हती आणि या देशांतील तणाव वाढतच होता.   कोणी केली शिफारस अमेरिकेतील ॲटर्नी ॲलन डेरशोवित्झ (Alan Dershowitz) यांनी हॉर्वर्ड लॉ स्कूलमधील एमिरिट्स प्राध्यापक या अधिकाराने नोबेल निवड समितीला या दोघांच्या नावांचा नोबेल शांतता पुरस्कारासाठी विचार करण्याची शिफारस एका पत्राद्वारे केली आहे. गेल्यावर्षी तत्कालीन अध्यक्ष ट्रम्प यांच्याविरुद्धच्या पहिल्या महाभियोगावेळी  डेरेशोवित्झ यांनी ट्रम्प यांचा बचाव केला होता. 20 जानेवारीला बायडेन यांनी सूत्रं स्वीकारल्यानंतर वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी म्हटलं होतं की 6 जानेवारीला कॅपिटलवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सिनेटने ट्रम्प यांच्याविरुद्ध दाखल केलेला महाभियोग मागे घ्यावा कारण ते आता अध्यक्ष राहिलेले नाहीत. या देशांतील संबंध सुरळीत करण्यामध्ये अमेरिकेचे इस्रायलमधील माजी राजदूत डेव्हिड फ्रिडमन आणि इस्रायलचे अमेरिकेतील माजी राजदूत रॉन डर्मर यांचीही महत्त्वाची भूमिका होती असं नोबेल समितीला पाठवलेल्या शिफारसपत्रात डेरेशोवित्झ यांनी लिहिलं होतं. आपण केलेली शिफारस वादग्रस्त ठरेल असंही त्यांना वाटलं होतं. त्यांनी लिहिलंय , ‘ नोबेल शांतता पुरस्कार हा काही प्रसिद्धीसाठी दिला जात नाही. तसंच ज्यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्याबद्दल आंतरराष्ट्रीय समुदायाला काय वाटतं याच्याशीही हा पुरस्कारसंबंधित नसतो. अल्फ्रेड नोबेल यांनी त्यांच्या इच्छापत्रात लिहिलेल्या शांतता प्रस्थापित करण्यासंबंधीच्या पात्रतेशी या पुरस्काराचा संबंध असतो.’ इस्रायलनी संयुक्त अरब अमिराती, बहारिन, सुदान आणि मोरक्कोशी केलेल्या कराराला मूर्त स्वरूप देण्यामध्ये ट्रम्प यांचे जावई कुशनर आणि मध्य पूर्व देशांतील एन्व्हॉय बेर्कोविट्झ यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

हे देखील वाचा - Myanmar News: म्यानमारमध्ये पुन्हा लष्काराचा सत्तेवर कब्जा, एका वर्षासाठी देशावर ताबा!

नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस झाल्याबद्दल आनंद झाल्याचं कुशनर यांनी पत्रक काढून जाहीर केलं. ऑक्टोबर 2021 मध्ये नोबेल पुरस्कार जाहीर होणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचं प्रशासन लवकरच ट्रम्प प्रशासनाच्या काळात अडकून पडलेले राष्ट्रीय सुरक्षेसंबंधीचे करार तसंच संयुक्त अरब अमिराती आमि सौदी अरेबियाशी झालेले शस्रास्र करार यांचा फेरआढावा घेणार आहे. पश्चिम सहारावरील अमेरिकेच्या सार्वभौमत्वाला धक्का लावत मोरक्को डिल केल्याचा काही अमेरिकी खासदारांनी आरोप केला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारीला विवादास्पद परिस्थितीत सत्तासूत्रं बायडेन यांच्याकडे सोपवली त्याचा परिणाम कदाचित त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांना मिळू शकणाऱ्या नोबेल पुरस्कारावरही होऊ शकेल.
Published by:news18 desk
First published:

Tags: Donald Trump, Nobel, Nobel peace prize, USA

पुढील बातम्या