लाहोर, 05 मार्च : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. इम्रान खान यांना बेकायदा निधी आणि दहशतवादाशी संबंधित प्रकरणी जामीन मिळाला आहे. मात्र तोशाखाना प्रकरणात त्यांच्या अडचणी वाढू शकतात. इस्लामाबाद पोलीस इम्रान खान यांच्या निवासस्थानी त्यांना अटक करण्यासाठी दाखल झाले आहेत. तसंच इम्रान खान यांच्या अटकेच्या कारवाईत जर कुणी अडथळा आणला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
पाकिस्तानमध्ये तोशाखानाचा अर्थ खजिन्याचे घर असा आहे. पाकिस्तानमध्ये तोशाखाना हा एक सरकारी विभाग आहे. याठिकाणी पंतप्रधान, राष्ट्रपती यांना देण्यात आलेल्या भेटवस्तू ठेवल्या जातात. १९७४ मध्ये हा तोशाखाना विभाग तयार कऱण्यात आला होता. या विभागात नेहमीच महागड्या भेटवस्तू ठेवल्या जातात. एखाद्या भेटवस्तूची किंमत ३० हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर ती राष्ट्रपती किंवा पंतप्रधान त्यांच्याकडे ठेवू शकतात. जर एखादा अधिकारी यातली भेटवस्तू घेणार असेल तर त्याला निश्चित अशी किंमत द्यावी लागते. ही किंमत तोशाखाना मूल्यांकन समितीकडून ठरवण्यात येते. २०१८ मध्ये इम्रान खान सत्तेत आल्यानंतर त्यांनी या किंमतीत ५० टक्के वाढ केली होती.
इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी अटक, इस्लामाबाद पोलीस लाहोरला निवासस्थानी दाखल
इम्रान खान २०१८ मध्ये पंतप्रधान झाले होते. तेव्हा त्यांनी अरब देशांमध्ये प्रवास केला. त्यावेळी तिथल्या शासकांकडून इम्रान खान यांना महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या. पाकिस्तानच्या नियमानुसार दुसऱ्या देशांकडून मिळालेल्या जास्त किंमतीच्या भेटवस्तू तोशाखानात ठेवाव्या लागतात. ऑगस्ट २०२२ मध्ये इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या. पाकिस्तानच्या सत्ताधारी आघाडीने निवडणूक आयोगाकडे एक याचिका दाखल केली. त्यात अशी मागणी केली की, पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पक्षाच्या अध्यक्षांनी आपल्या संपत्तीची घोषणा केली त्यात तोशाखानातून मिळालेल्या भेटवस्तूंबाबत माहिती दिली नाही.
दरम्यान, पाकिस्तानी माध्यमांनी इम्रान खान यांनी आखाती देशातून भेट म्हणून मिळालेल्या किंमती घड्याळांची विक्री केल्याचं वृत्त दिलं होतं. यातून इम्रान खान यांनिी ३६ मिलियन रुपये कमावल्याचा आरोपही झाला. तेव्हा इम्रान खान यांना या पूर्ण प्रक्रियेसाठी सरकारने कायद्याने परवानगी दिल्याचं म्हटलं होतं. पण ऑक्टोबर २०२२ मध्ये पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या पाच सदस्यीय पीठाकडून तोशाखाना प्रकरणी इम्रान खान यांना पाच वर्षे सार्वजनिक कार्यालय सांभाळण्यास बंदी घातली. तसंच इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचार विरोधी कायद्यांतर्गत कारवाई होईल असंही सांगण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Imran khan, Lahore, Pakistan