जपान, 21 मे : जगातील सर्वांत मोठं रेल्वेचं जाळं असलेल्या देशांपैकी एक असलेल्या आपल्या देशात अनेक रेल्वे अपघात घडत असतात. रेल्वे ड्रायव्हर्सच्या (Railway Drivers) हलगर्जीपणाचे अनेक किस्सेही आपण ऐकतो. जगातील सर्वांत सुरक्षित आणि जलद, अत्याधुनिक रेल्वे सेवेसाठी जपान (Japan) प्रसिद्ध आहे. नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबतही जपानचं नाव घेतलं जातं. अशा जपानमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. बीबीसी डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, जपानमधील बुलेट ट्रेनचा (Bullet Train) ड्रायव्हर ट्रेन धावत असतानाच ट्रेनची जबाबदारी कंडक्टरवर सोपवून लघुशंकेला गेल्याची घटना घडली आहे. मात्र अवघ्या तीन मिनिटांसाठी केबिन सोडून गेलेल्या या ड्रायव्हरवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सेंट्रल जपान रेल्वे कंपनीनं (Central Japan Railway Company) रविवारी ही घटना घडल्याचे कळवले आहे. 150 किलोमीटर वेगानं धावणाऱ्या हिकारी 633 (Hikari 633)या ट्रेनमध्ये 160 प्रवासी होते. या रेल्वेचा ड्रायव्हर केबिनमधून प्रवाशांसाठी असलेल्या वॉशरूममध्ये गेला होता. त्या दरम्यान, कंडक्टरनं (Conductor) लक्ष ठेवलंहोतं. अर्थात, यामुळे ट्रेनच्या प्रवासावर कोणताही परिणाम झाला नाही, पण नियमाचं उल्लंघन केल्याबद्दल ड्रायव्हर आणि कंडक्टर (Train Driver and Conductor) यांच्यावर कारवाई करण्यात येणार असून, त्यांना शिक्षा होईल, असं कंपनीनं म्हटलं आहे. हे ही वाचा- चीनच्या झुरोंग रोव्हरचं मंगळावरील काम सुरू, पाठवला पृष्ठभागाचा पहिला PHOTO जपानमधील नियमांनुसार, बुलेट ट्रेनच्या ड्रायव्हरला काही कारणाने आपली केबिन सोडून बाहेर यायचे असेल, अस्वस्थ वाटत असेल तर तो कंडक्टरवर जबाबदारी सोपवून जाऊ शकतो; पण त्या कंडक्टरकडे ड्रायव्हिंग लायसन्स (Train Driving Licence) असणं आवश्यक आहे. तसंच ड्रायव्हरने आपली केबिन सोडण्यापूर्वी ट्रान्सपोर्ट कमांड सेंटरला (Transport Command Centre) कळवणं अत्यावश्यक असते. मात्र 36 वर्षीय ड्रायव्हरने सेंट्रल कमांडर ट्रान्सपोर्टला न कळवता परवाना नसलेल्या कंडक्टरवर जबाबदारी सोपवून गेल्यानं त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचं जपानच्या रेल्वेनं म्हटलं आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी मासाहीरो हयात्सु यांनी या चुकीबद्दल माफी मागितली आहे. जपानमध्ये 2005 मध्ये रेल्वेचा सगळ्यात मोठा अपघात झाला होता, त्यात 107 जणांचा मृत्यू झाला होता. तर शिनकानसेन (Shinkansen Bullet Train Network) बुलेट ट्रेन नेटवर्कमध्ये 57 वर्षांच्या इतिहासात एकही अपघात झालेला नाही. वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा यासाठी जपानी लोक ओळखले जातात. तिथे अप्रामाणिकपणा अजिबात खपवून घेतला जात नाही. त्याचबरोबर या घटनेमध्ये ड्रायव्हरच्या कृत्यामुळे ट्रेनमध्ये असलेल्या प्रवाशांच्या जीवाला निर्माण झाला होता त्यामुळे त्यावर नक्कीच कारवाई होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.