थायलंड, 10 मार्च: सध्या कोरोनाच्या साथीनं (Corona Pandemic) जगभरातील लोक त्रस्त झाले आहेत. जवळपास वर्षभर सहन करावे लागत असलेले निर्बंध, धास्ती, आर्थिक संकट यामुळं मानसिकदृष्ट्याही लोक कमकुवत झाले आहेत. या सगळ्या परिस्थितीला नागरिक तोंड देत असतानाच राजकीय नेत्यांना जनतेच्या प्रश्नांना सातत्यानं सामोरे जावे लागत आहे. त्यामुळं त्यांचाही संयम कधी कधी संपल्याचं दिसत आहे. थायलंडचे (Thailand) पंतप्रधान (Prime Minister) प्रयुथ चान-ओचा (Prayuth Chan-Ocha) यांनी केलेली धक्कादायक कृती याचंच उदाहरण म्हणावे लागेल. (Thai PM sprays sanitizer on journalists) पंतप्रधानपदी असलेल्या ओचा यांच्या अगम्य वर्तनानं सगळ्यांनाच बुचकळ्यात पाडलं असून, सर्वत्र त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
थायलंडचे पंतप्रधान प्रयुथ चान-ओचा यांची मंगळवारी पत्रकार परिषद (Press-Conference) सुरू होती. त्या वेळी त्यांनी काही प्रश्न टाळण्यासाठी चक्क हातातील सॅनिटायझरच्या बाटलीनं (Hand Sanitizer Bottle)पत्रकारांवर सॅनिटायझरची फवारणी केली.
सात वर्षांपूर्वी झालेल्या निषेध आंदोलनादरम्यान बंडखोरी करणाऱ्या तीन मंत्र्यांना गेल्या आठवड्यात तुरूंगात टाकण्यात आलं आहे. या मंत्र्याच्या रिक्त झालेल्या जागांवरील संभाव्य उमेदवारांबद्दल पत्रकारांनी विचारणा केली असता, प्रयुथ नाराज झाले. ‘दुसरे काही प्रश्न आहेत का? असा सवाल करत ते व्यासपीठावर उभे राहिले आणि आधीच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल, मला माहित नाही, मी ते पाहिले नाही. पंतप्रधानांना माहित असावी अशी ही एकच गोष्ट आहे का? असं म्हणत व्यासपीठावरून उतरून पत्रकारांकडे आले. त्यानंतर स्वतःच्या तोंडावर सर्जिकल मास्क (Surgical Mask) लावत, हातातील सॅनिटायझरच्या छोट्या बाटलीनं पत्रकारांच्या तोंडावर सॅनिटायझरची फवारणी करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या वागण्यानं उपस्थित सर्व पत्रकार स्तंभित झाले.
हे वाचा - 'हवं तर मला गोळी मारा, पण या लोकांना जाऊ द्या'; धगधगत्या म्यानमारमधला हृदय हेलावून टाकणारा VIDEO
पंतप्रधानांच्या अशा धक्कादायक वागणुकीचं नेमकं काय कारण आहे, हेच कोणाला समजेना. सगळेजण संभ्रमित झाले होते. पत्रकारांच्या गटाबरोबर प्रयुथ हे ऐकू न येण्यासारखे आवाजात बोलत हातानं त्यांना दूर सारत निघून जात असतानाचं चित्रणही या वेळी करण्यात आलं. या घटनेचे फोटो आणि चित्रण सर्वत्र प्रसिद्ध झालं असून, पंतप्रधान पदावर असलेल्या व्यक्तीच्या अशा वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
प्रयुथ हे माजी सैन्यदल अधिकारी (Former Military Coup Leader) आहेत. काही वेळा ते माध्यमांवर विनोदी ताशेरे मारतात; मात्र अनेकदा ते पत्रकारांवर चिडत असल्याचं दिसून आलं आहे. तरीही त्यांचे हे वर्तन राजकीय शिष्टाचाराला शोभणारे नसल्यानं जनतेत आणि माध्यमांमध्येही याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.