कोलंबो, 19 जानेवारी: भारताचा शेजारी देश असणाऱ्या श्रीलंकेनं (Sri Lanka) आता सोनं (Gold) विकून गुजराण (Survive) करायला सुुरुवात केली आहे. अशा प्रकारे श्रीलंका आपल्या अर्थव्यवस्थेला (Economy) तात्पुरत्या स्वरुपात सावरण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील तिजोरीत पूर्ण खडखडात झाल्याने देश चालवण्यासाठी आता श्रीलंकेकडे पैसेच उरलेले नाहीत. त्यामुळे रिझर्व्हमध्ये असणारं सोनं विकून दिवस कंठण्याची वेळ या देशावर आली आहे. श्रीलंकेच्या ताब्यात असणारं विदेशी चलन आता पूर्णतः संपत आलं आहे. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून सोन्याला हात लावण्याशिवाय कुठलाच पर्याय उरला नसल्याचं सांगण्यात येत आहे. सोन्याचा साठाही घटला गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोन्याचा वापर खर्च भागवण्यासाठी केला जात असल्यामुळे देशातील सोन्याचे साठेदेखील संपत चालले आहेत. श्रीलंकेच्या मध्यवर्ती बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर डॉ. विजयवर्धने यांनी माध्यमांना ही माहिती दिली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटरमध्ये सोन्याचा किती साठा होता आणि तो आता किती आटला आहे, याची आकडेवारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी श्रीलंका सरकारकडे 38.2 कोटी डॉलर सोनं होतं. त्यात घट होऊन आता ते केवळ 17.5 कोटी डॉलर झालं आहे. सोन्याची विक्री करून त्यातून लिक्विड फॉरेन ऍसेट्स उभ्या करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. सोनं होतंय कमी एका रिपोर्टनुसार चीनसोबत करन्सी एक्सचेंज केल्यानंतर श्रीलंकेच्या सोन्याच्या साठ्यात वाढ झाली होती. 2021 च्या सुरुवातीला श्रीलंकेकडे 6.69 टन सोनं होतं. त्यातील जवळपास निम्मं सोनं आता खर्च झालं असून तिजोरीत केवळ 3.6 टन सोनं उरलं आहे. हे वाचा -
भारतालाही आला होता अनुभव भारतातही 1991 च्या उदारीकरणापूर्वी असाच अनुभव आला होता. देशाच्या तिजोरीत खडखडाट झाला होता आणि देशावर सोनं विकण्याची वेळ आली होती. मात्र तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी या संकटातून देशाला बाहेर काढलं होतं. श्रीलंकेत काय होतं, याकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे.