बिजिंग, 20 फेब्रुवारी: केवळ एकाच मुलाला जन्म देण्याचा वादग्रस्त निर्णय मागे घेतल्यानंतर चार वर्षांनी घटता जन्मदर वाढवण्यासाठी चीन (China) आता अतिरिक्त पर्यायांचा देखील विचार करत आहे. कारण चीनमध्ये घटता जन्मदर ही नवीन समस्या डोकं वर काढू लागली आहे. चीनमध्ये अनेक दशकांपासून वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी मुलांना जन्म देण्यावर काही प्रमाणात निर्बंध आणले होते. अनेक नियमांची सक्ती करण्यात आली होती. दरम्यान याचा परिणाम उलट झाला असून आता या देशात घटत्या जन्मदराचा सामना करावा लागत आहे.
घसरणारा जन्मदर आता आर्थिक प्रगती आणि सामाजिक स्थिरतेसाठी मोठा धोका म्हणून पाहिले जात आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की जन्म क्षमता वाढविण्यासाठी ते संशोधन करतील. आयोगाने म्हटले आहे की या उपक्रमात प्रथम ईशान्येकडे लक्ष केंद्रित केले जाईल, याठिकाणी देशातील प्रमुख औद्योगिक क्षेत्र आहे ज्याठिकाणी लोकसंख्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. कारण तरुण आणि कुटुंबं चांगल्या संधींसाठी इतरत्र स्थलांतरित झाली आहेत.
2019 मध्ये लोकसंख्या कमी झाली
लिओनिंग, जिलीन आणि हेलॉन्गजियांग या तीन प्रांतांचा समावेश असलेल्या या प्रदेशात सलग सातव्या वर्षी 2019 मध्ये लोकसंख्या घटल्याचे दिसून आले. नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स ऑफ चायनानुसार 2019 मध्ये जन्म दर 10.48 प्रति हजार होता जो 1949 पासून सर्वात कमी आहे. 2019 मध्ये 1 कोटी 46 लाख 50 हजार मुले जन्माला आली, जी पूर्वीच्या तुलनेत 5 लाख 80 हजारने कमी होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Birth rate, China, Economy, International, One child policy