म्यानमार 26 मार्च : म्यानमारच्या (Myanmar) सेनेने क्रूरतेच्या सीमा ओलांडल्या आहेत. अनेक आंदोलकांवर गोळीबार केल्यानंतर आता एका सात वर्षीय निष्पाप चिमुकलीचा जीव घेतला आहे. सेनेच्या आदेशानुसार प्रदर्शनकर्त्यांना मारण्यासाठी पोहोचलेल्या पोलिसांनी आधी घराचा दरवाजा तोडला आणि आतमध्ये गेले. यानंतर वडिलांच्या मांडीवर बसलेल्या एका चिमुकलीच्या डोक्यात गोळी झाडत तिला ठार (Girl Shot Dead By Police) केलं. मृत खिन मायो चित प्रदर्शनकर्त्यांवर करण्यात आलेल्या कारवाईत जीव गमावलेली सर्वात कमी वयाची पीडिता ठरली आहे. पोलिसांच्या गोळीबारात आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. CNN च्या रिपोर्टनुसार, मृत मुलीची शेजारी असलेल्या सुमायानं सांगितलं, की पोलीस मांडले शहरात मंगळवारी प्रदर्शनकर्त्यांचा शोध घेत होते. यावेळी काही पोलीस आले आणि त्यांनी लाथ मारुन खिनच्या घराचा दरवाजा तोडला. यानंतर पोलीस घरात घुसले. पोलिसांनी या मुलीच्या वडिलांना विचारलं, की कोणी प्रदर्शनासाठी बाहेर गेलं होतं का? जेव्हा मुलीच्या वडिलांनी या प्रश्नाचं उत्तर नाही असं दिलं तेव्हा पोलीस भडकले. पोलिसांनी मुलीच्या वडिलांना खोटं बोलल्याचा आरोप करत त्यांना मारहाण केली. हे पाहून खिन मायो चित आपल्या वडिलांच्या कुशीत बसली. मात्र, तरीही पोलिसांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. यात एक गोळी या मुलीला लागली आणि तिचा जागेवरच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सेनेच्या गोळीबारात २० मुलांचा मृत्यू झाला आहे. म्यानमारच्या सेनेनं एक फेब्रुवारीला सत्तापालट केली होती. तेव्हापासून आजपर्यंत रोज प्रदर्शन केलं जात आहे. मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरुन अटक करण्यात आलेल्या नेत्यांच्या सुटकेची मागणी करत आहेत. नोव्हेंबरमधील निवडणूक फसवणूक झाली होती असा लष्कराचा दावा आहे. त्याच आधारे एका वर्षासाठी आणीबाणी लागू करण्यात आली आहे. युरोपियन युनियन आणि अमेरिकेने या सत्तापालटात सामील झालेल्यांवर बंदी घातली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.