लंडन 15 मे : स्कॉटलँडच्या (Scotland) ग्लासगोमध्ये इमिग्रेशन नियमांचं उल्लंघन (Violation of Immigration Laws) केल्याच्या आरोपात दोन भारतीयांना ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र, लोकांनी मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन करताच दोघांनाही सोडून देण्यात आलं. या घटनेनंतर मानवाधिकारप्रकरणी काम करणारे वकील आणि त्यांच्या शेजारऱ्यांनी रस्त्यावर जमा होत जवळपास आठ तास विरोध प्रदर्शन केलं. दोन्ही भारतीयांची ओळख शेफ सुमित सहदेव आणि मॅकेनिक लखवीर अशी पटली आहे. हे दोघंही मागील दहा वर्षापासून ब्रिटनमध्ये राहात असल्याचं म्हटलं जात आहे. यूके इमिग्रेशन इन्फोर्समेंटच्या सहा अधिकाऱ्यांनी स्कॉटलँड पोलिसांच्या मदतीनं या दोघांना घराबाहेर काढत व्हॅनमध्ये बसवलं आणि तुरुंगाकडे घेऊन जाण्यासाठी निघाले. मात्र, इतक्यात प्रदर्शनकर्त्यांच्या एका मोठ्या गटानं जमा होत त्यांना सोडण्याची मागणी केली.
This is incredible.
— Sawyer Hackett (@SawyerHackett) May 13, 2021
Two refugees were detained by immigration enforcement in Glasgow, Scotland. Neighbors and activists surrounded the van they were detained in until they were released. pic.twitter.com/v5sRhVq7gh
पाकिस्तानी मूळचे मानवाधिकार वकील आमेर अन्वर यांनी आयटीव्ही न्यूजला सांगितलं की, ईदच्या दिवशी केलेली ही कारवाई भडक आहे. खरंतर ग्लासगोमधील नागरिकांना या लोकांच्या जीवाची चिंता आहे. हे शहर लोकांच्या सहयोगानं बनलं आहे, या लोकांनी आपले रक्त, घाम आणि अश्रू गाळले आहेत. आम्ही या लोकांसोबत आहोत, असं ते म्हणाले. लखवीरसिंग यांनी पंजाबी भाषेत बोलत सांगितले की, अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतल्यावर काय होईल याची भीती वाटू लागली. शेजा-यांनी केलेल्या समर्थनाबद्दल त्यांनी त्यांचे आभारही मानले. ग्लासगोच्या पोलोकशिल्ड्स परिसरातील शेकडो स्थानिक नागरिकांनी दोन्ही भारतीयांना घेऊन जाणारी बॉर्डर एजन्सीची व्हॅन थांबविण्याचा प्रयत्न केला, असं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे. या प्रदर्शनकर्त्यांनी यावेळी घोषणाबाजीही केली. आमच्या शेजाऱ्यांना सोडा, त्यांना जाऊ द्या आणि पोलिसांनी घरी परत जा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.