मास्को, 24 जून : रशिया आणि युक्रेमध्ये युद्ध सुरूच आहे. मात्र आता रशियामधून एक मोठी बातमी समोर येत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या अडचणीत वाढ झालीये. पुतीन यांच्या खासगी मिलिशिया वॅगनर ग्रुपनं बंड केलं आहे. वॅगनर ग्रुप आणि रशियन सैनिक यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला आहे. टीएएसएस या वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार मॉस्कोमध्ये रणगाडे तैनात करण्यात आले आहेत. वॅगनर ग्रुपनं बंड केल्यामुळे रशियात सत्तापालट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वॅगनरच्या प्रशिक्षण शिबीरावर हल्ला मीडिया रिपोर्ट्सनुसार युक्रेनमध्ये असलेल्या वॅगनर प्रशिक्षण शिबीरावर क्षेपणास्त्र हल्ला झाला होता. या हल्ल्यासाठी वॅगनर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनी रशियन सैन्याला जबाबदार धरले आहे. या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये वॅगनरचे अनेक सैनिक मारले गेले होते. त्यामुळे वॅगनर ग्रुप प्रचंड आक्रमक झाला आहे. वॅगनरने बंडखोरी केल्यामुळे रशियावर मोठं संकट आलं असून सत्तापालटाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घराबाहेर न पडण्याचं आवाहन वॅगनर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, आमच्या सैनिकांनी दक्षिण सीमा क्षेत्रात प्रवेश केला आहे. आम्ही दक्षिणेकडील अनेक सैनिकांची प्रमुख केंद्र आणि जिल्हा प्रशासनाच्या इमारती ताब्यात घेतल्या आहेत. आमचे 25 हजार सैन्य या लढाईसाठी पूर्णपणे तयार असून ते बलिदानासाठी तयार आहेत. वॅगनर ग्रुपच्या बंडामुळे रशियातील वातावरण बिघडलं असून, नागरिकांनी आपल्या घरातच राहावं बाहेर पडू नये असं आवाहन रशियन प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.