रशिया, 24 फेब्रुवारी: एक मोठी बातमी समोर येत आहे. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनविरुद्ध युद्धाची घोषणा केली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेननं सहकार्य केल्यास नाटोला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली आहे. मात्र युक्रेनवर कब्जा करण्याचा आपला इरादा नसल्याचं पुतीन यांनी स्पष्ट केलं आहे. युक्रेनच्या सैन्यानं शस्त्र खाली ठेवून माघार घ्यावी, असे रशियाच्या राष्ट्राध्यांनी म्हटलं आहे. युद्ध जाहीर केल्यानंतर लगेचच युक्रेन आणि राजधानी कीवमधील बंडखोरांच्या ताब्यातील भागात मोठे स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. वृत्तानुसार, क्रमाटोस्कमध्ये 2 स्फोट ऐकू आले आहेत. रशियन सैनिक क्रिमियामार्गे युक्रेनमध्ये प्रवेश करत आहेत. दोन लाखांहून अधिक रशियन सैनिक सीमेवर तैनात आहेत. पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक भागात स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. संयुक्त राष्ट्राकडून शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे. फ्रान्सनं बुधवारी आपल्या नागरिकांना युद्धाच्या धोक्यात विलंब न करता युक्रेन सोडण्यास सांगितलं. फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, युक्रेनच्या सीमेवर रशियन सैन्य जमा झाल्यामुळे गंभीर तणाव निर्माण झाला आहे. तसेच, दोन फुटीरतावादी प्रदेशांना रशियाने मान्यता दिली असून युक्रेननं आणीबाणी लागू केली आहे. त्यामुळे युक्रेनमधील फ्रेंच नागरिकांनी विलंब न करता देश सोडला पाहिजे. युक्रेनमध्ये देशव्यापी आणीबाणी जाहीर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांना त्यांच्या देशाबाहेर लष्करी शक्ती वापरण्याचा अधिकार दिल्यानंतर युक्रेननं (Ukraine) बुधवारी देशव्यापी आणीबाणी घोषित केली. दरम्यान, पाश्चात्य देशांनी रशियाविरुद्ध अनेक निर्बंधांची घोषणा केली. मॉस्कोनं (Moscow) युक्रेनमधील आपल्या दूतावासाचा परिसर रिकामा केला आणि राजनैतिक कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं. युक्रेनच्या खासदारांनी राष्ट्रव्यापी आणीबाणी लागू करण्याच्या राष्ट्राध्यक्ष वलोदिमिर जेलेन्स्की यांच्या आदेशाला मान्यता दिली, जी आजपासून म्हणजेच गुरुवारपासून 30 दिवसांसाठी लागू राहिल. रशियाने युक्रेनमधील आपला दूतावास रिकामा केला रशियाच्या सरकारी वृत्तसंस्थेनं बुधवारी सांगितलं की, मॉस्कोनं युक्रेनमधील आपला दूतावास रिकामा केला आहे. त्याचबरोबर युक्रेननंही आपल्या नागरिकांना रशिया सोडण्याचं आवाहन केलं आहे. मॉस्कोचे कीवमध्ये दूतावास आणि खार्किव, ओडेसा आणि ल्विव्हमध्ये वाणिज्य दूतावास आहेत. रशियानं युक्रेनमधील आपले राजनैतिक प्रतिष्ठान रिकामे केले असल्याचे तासच्या वृत्तात म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.