वॉशिंग्टन, 10 मे: पत्रकारितेतील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या पुलित्झर पुरस्कारांची (Pulitzer Prize 2022) घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी या यादीमध्ये चार भारतीयांची नावे आहेत. पत्रकारितेसोबतच साहित्य, नाटक आणि संगीत क्षेत्रांमधील दिग्गजांना हा पुरस्कार (Pulitzer awards 2022) देण्यात येतो.
पुलित्झर पुरस्कार हा पत्रकारिता क्षेत्रातील अमेरिकेतील सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे. 1917 साली याची सुरुवात झाली होती. 2022 च्या यादीमध्ये वॉशिंग्टन पोस्टसोबत भारतीय पत्रकार अदनान अबिदी (Adnan Abidi), सना इरशाद मट्टू (Sana Irshad Mattoo), अमित दवे (Amit Dave) यांचा समावेश आहे. तर रॉयटर्स वृत्तसंस्थेचे दिवंगत फोटोजर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांना मरणोत्तर पुलित्झर (Danish Siddique) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तालिबान आणि अफगाणिस्तान युद्धादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.
पत्रकारितेतील या दिग्गजांना मिळाला पुरस्कार
सार्वजनिक सेवा : अमेरिकेतील कॅपिटल हिलवर 6 जानेवारी 2021ला झालेल्या हल्ल्याच्या रिपोर्टिंगसाठी वॉशिंग्टन पोस्टला हा पुरस्कार देण्यात आला.
ब्रेकिंग न्यूज रिपोर्टिंग : मियामी हेराल्डच्या कर्मचाऱ्यांना फ्लोरिडातील समुद्र किनाऱ्यावरील अपार्टमेंट ढासळण्याच्या बातमीचं कव्हरेज केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.
शोधपत्रकारिता : फ्लोरिडाच्या एकमेव बॅटरी रिसायकलिंग प्लांटमधील विषारी घटकांमुळे निर्माण होणारे धोके सर्वांसमोर आणल्याबद्दल रेबेका वुलिंगटनचे कोरी जी. जॉनसन आणि टॅम्पा बे टाईम्सच्या एली मरे यांना हा पुरस्कार देण्यात आला.
हे वाचा-राहुल द्रविडची राजकारणात एन्ट्री? कर्नाटक निवडणुकीआधी सुरू करणार नवी इनिंग
स्पष्टीकरणात्मक रिपोर्टिंग : वेब स्पेस टेलिस्कोप कशाप्रकारे काम करतो याचे विशेष रिपोर्टिंग केल्याबद्दल क्वांटास पत्रिकेच्या कर्मचाऱ्यांना आणि खासकरून नॅटली वोल्चोवर यांना हा पुरस्कार देण्यात आला.
स्थानिक रिपोर्टिंग : बेटर गव्हर्नमेंट असोसिएशनच्या मॅडिसन हॉपकिन्स आणि शिकागो ट्रिब्युनच्या सेसिलिया रेयेस यांना शिकागोतील अर्धवट भवन आणि अग्निसुरक्षेसंबंधी रिपोर्टिंग केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.
राष्ट्रीय रिपोर्टिंग : दी न्यूयॉर्क टाईम्सच्या कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
आंतरराष्ट्रीय रिपोर्टिंग : हा पुरस्कारदेखील दी न्यूयॉर्क टाईम्सच्या कर्मचाऱ्यांनी मिळवला.
फीचर लेखन : दी अटलांटिकच्या जेनिफर सीनिअर यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
फीचर फोटोग्राफी : भारतातील कोरोना काळातील फोटोंसाठी अदनान आबिदी, सना इरशाद मट्टू आणि अमित दवे यांना; तसंच रॉयटर्सचे दिवंगत फोटोग्राफर दानिश सिद्दीकी यांनादेखील हा पुरस्कार जाहीर झाला.
हे वाचा-श्रीलंकेत हिंसाचार; राजीनाम्यानंतर पंतप्रधान राजपक्षे यांच्या घराला लावली आग; खासदारानं स्वतःवर झाडली गोळी
कॉमेंट्री : सर्वोत्कृष्ट कॉमेंट्रीचा पुरस्कार मेलिंडा हेनेबर्गर यांना जाहीर झाला.
टीकाकार : सर्वोत्कृष्ट टीकाकार म्हणून दी न्यूयॉर्क टाईम्सच्या सलामिशा टिलेट यांना पुरस्कार जाहीर झाला.
सचित्र रिपोर्टिंग आणि कॉमेंट्री : फहमिदा अझीम, अँथनी डेल कर्नल, जॉश अॅडम्स आणि वॉल्ट हिक्की यांना हा पुरस्कार जाहीर झाला.
ऑडिओ रिपोर्टिंग : फ्युचुरो मीडिया आणि पीआरएक्सच्या कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार जाहीर झाला.
पत्रकारितेसोबतच साहित्य, नाटक आणि संगीत क्षेत्रातही पुलित्झर पुरस्कार देण्यात येतो. या कॅटेगरीमधील यंदाचे विजेते (Pulitzer Prize 2022 winners list) पुढीलप्रमाणे :
कादंबरी : जोशुआ कोहेन यांना ‘दी नेतन्याहूज’ या कादंबरीसाठी यंदाचा पुरस्कार जाहीर झाला.
चरित्र : ‘चेसिंग मी टू माय ग्रेव्ह’ या पुस्तकाला सर्वोत्कृष्ट चरित्रपर पुस्तक म्हणून पुरस्कार जाहीर झाला.
कविता : डायने सिस यांच्या फ्रँक : सॉनेट्स या कवितासंग्रहाला यंदाचा पुलित्झर जाहीर झाला.
नॉन फिक्शन : ‘इन्व्हिझिबल चाईल्ड : पॉव्हर्टी, सर्वायव्हल अँड होप इन अॅन अमेरिकन सिटी’ या पुस्तकाला सर्वोत्कृष्ट नॉन फिक्शन पुरस्कार जाहीर झाला.
संगीत : ‘व्हॉइसलेस मास’ रचनेसाठी रेवेन चाकोन यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.