कोलंबो, 11 जुलै : श्रीलंकेतला (Srilanka Political Crisis) अभूतपूर्व गोंधळ अद्याप थांबण्याची चिन्हं नाहीत. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajpaksa) यांच्या सरकारी निवासस्थानावर, तसंच राष्ट्राध्यक्षांच्या सचिवालयावर सरकारविरोधी आंदोलकांनी (Protesters) शनिवारी (9 जुलै) कब्जा केला होता. रविवारी (10 जुलै) त्यांनी तिथेच एका नकली कॅबिनेट बैठकीचं (Mock Cabinet Meeting) आयोजनही केलं होतं. त्या बैठकीत आंदोलकांनी देशाची परकीय गंगाजळी आणि आर्थिक संकटावर चर्चा केली. ‘आज तक’ ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून तेथे महागाई प्रचंड वाढली आहे. देशाची परकीय गंगाजळी (Forex) एकदम कमी झाली आहे. आर्थिक संकट अधिक तीव्र झाल्याने देशवासीयांचा उद्रेक होत आहे. या वर्षीच्या मे महिन्यात तत्कालीन पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना नागरिकांच्या मोठ्या आंदोलनांनंतर राजीनामा देणं भाग पडलं होतं. सध्याचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे हे महिंदा (Mahinda Rajpaksa) यांचे मोठे भाऊ. ‘लिट्टे’विरोधातलं देशांतर्गत युद्ध जिंकल्यामुळे महिंदा आणि गोटाबाया या दोघा भावांना श्रीलंकावासीयांना काही वर्षांपूर्वी मोठा सन्मान दिला होता; मात्र आता देशावर आलेल्या आर्थिक संकटालाही त्यांना जबाबदार धरलं जात असून, म्हणूनच आंदोलनाची धार वाढली आहे. श्रीलंकेतील भयानक आर्थिक संकटानंतर नागरिकांचा उद्रेक; अखेर पंतप्रधानांची राजीनाम्याची घोषणा शनिवारी (9 जुलै) आंदोलकांनी हिंसक रूप धारण केल्यानंतर 73 वर्षांच्या गोटाबाया राजपक्षे यांनी आपल्या अधिकृत सरकारी निवासस्थानातून पळ काढला होता. ते सध्या कुठे आहेत, याची काही कल्पना नाही; मात्र ते आपल्या परिवारासह भूमिगत झाले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एका अज्ञात स्थळावरून त्यांनी संसद अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांच्याकडे निरोप दिला आहे, की ते 13 जुलै रोजी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे (Ranil Vikramsinghe) यांनीही राजीनामा दिला; मात्र आंदोलकांचा राग शमला नाही. त्यांनी राजधानी कोलंबोमधल्या एका संपन्न भागात असलेल्या विक्रमसिंघे यांच्या खासगी घराला आग लावली. भारताचा अभिमानास्पद शेजारधर्म! आम्ही श्रीलंकेच्या नागरिकांसोबत म्हणत 3.8 अब्ज US डॉलरची मदत आंदोलकांनी शनिवारी (9 जुलै) राष्ट्राध्यक्ष भवनावर ताबा मिळवला असून, त्यांची बेडरूम, स्विमिंग पूल, जिम अशा सर्व ठिकाणी जाऊन धुमाकूळ घातला. रविवारी आंदोलकांनी राष्ट्राध्यक्षभवनात एक नकली कॅबिनेट बैठक घेतली. त्यात देशाच्या बिकट आर्थिक परिस्थितीसोबतच विक्रमसिंघे यांच्या घराला आग लावण्याच्या झालेल्या प्रकाराबद्दलही चर्चा करण्यात आली. या बैठकीत एका परदेशी युवकालाही सहभागी करून घेण्यात आलं होतं. आंदोलकांनी राष्ट्राध्यक्ष भवनावर ताबा मिळवल्यानंतर तो युवक तिथे फिरायला गेला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.