मुंबई, 12 मार्च : भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया सदस्य असलेल्या ‘क्वाड’ (Quad) देशांच्या प्रमुखांची बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या (Video Conferencing) माध्यमातून शुक्रवारी होणार आहे. या बैठकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) पहिल्यांदाच एखाद्या आंतरराष्ट्रीय मंचावर एकत्र असतील. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन (Scott Morrison) आणि जपानचे पंतप्रधान योशिहिडे (Yoshihide Suga) हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
जगातील चार शक्तीशाली देशांच्या प्रमुखांच्या बैठकीत कोरोना व्हॅक्सिन, हवामन बदल, तांत्रिक सहकार्य या विषयांवर चर्चा होणार आहे. पण चीन हाच या बैठकीचा केंद्रबिंदू असेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात चीनच्या धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय पेच निर्माण झाला होता. कोरोना विषयक माहिती लपवल्याचा आरोप चीनवर झाला होता. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी या विषयावर चीनवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर मागच्या वर्षी भारत आणि चीमच्या सीमेवरही चीनच्या आक्रमक धोरणांमुळे तणाव निर्माण झाला होता. दक्षिण चीन समुद्रामध्ये (South China Sea) सतत दादागिरी करत असल्याचा आरोप चीनवर आहे.
बायडेन सरकारचे चीन धोरण
जो बायडेन यावर्षी जानेवारी महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष झाले आहेत. नव्या अध्यक्षांचे चीनबद्दलचे धोरण कडक आहे. अमेरिकेतील प्रभावशाली सिनेटर्सनी चीनबद्दल अनेक प्रस्ताव सादर केले आहेत.त्यांनी दक्षिण चीन समुद्राच्या परिसरातील चीनच्या हलचालींवर टीका केली आहे. त्याचबरोबर चीनच्या आर्थिक शक्तीचा सामना करण्यासाठी देखील अनेक प्रस्ताव सादर केले आहेत. यामुळे जागतिक बाजारात चीनसोबतच अमेरिकेचाही तोटा होणार आहे.
(हे वाचा : 'या' देशात कोविड-19 व्हायरस पासपोर्ट लाँच; ही सुविधा देणारा ठरला पहिलाच देश )
QUAD चा उद्देश काय?
चीनच्या वाढत्या प्रभावाचा सामना करण्यासाठी 2007 साली QUAD समुहाची स्थापना झाली होती. त्यानंतर चीनच्या विरोधातील कोणत्याही प्रयत्नांमध्ये भारत सहभागी होणार नाही, असे सांगत तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी भारताला या समुहापासून वेगळे केले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलिया देखील यामधून वेगळा झाला होता.
आता कोरोना महामारी आणि आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील चीनची दादागिरी याचा समाना करण्यासाठी QUAD समुहातील देश पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. त्यामुळे या बैठकीमध्ये ते पुन्हा एकदा चीन हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, Donald Trump, International, Joe biden, Online meetings, PM Naredra Modi