पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर असून ते आज न्यूयॉर्कला (PM Modi In New York) संयुक्त राष्ट्र आमसभेच्या 76 व्या सत्राला संबोधित करण्यासाठी पोहोचले आहेत, पंतप्रधान मोदी न्यूयॉर्कमध्ये पोहोचताच त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं.
तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वॉशिंग्टनमध्येही जोरदार स्वागत करण्यात आलं होते. त्यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेतली होती.
'पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत करताना अमेरिकेला आनंद होत आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याच्या राजवटीच्या तत्त्वांमध्ये खोलवर रुजलेले आहेत', असं वक्तव्य एका अमेरिकन खासदारने केलं आहे.
25 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र आमसभेत भाषण देऊन मोदींच्या अमेरिका दौऱ्याची सांगता होईल. संयुक्त राष्ट्रसंघामध्ये ते कोरोना महासाथ, दहशतवाद, हवामान बदल आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करू शकतात.
तत्पूर्वी मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आयोजित केलेल्या QUAAD (Quadrilateral Security Dialogue) नेत्यांच्या पहिल्या वैयक्तिक शिखर परिषदेत भाग घेतला.
व्हाइट हाऊसच्या ओव्हल कार्यालयात पंतप्रधान मोदींचं स्वागत करताना राष्ट्राध्यक्ष बायडन म्हणाले की, आम्ही अमेरिका-भारत संबंधांमध्ये नवीन अध्याय सुरू करत आहेत.