चीन, 12 जून : अमेरिकेनंतर मंगळ ग्रहावर (Mars Planet) रोव्हर (Rover) उतरवण्यात यश आलेल्या चीननं आज या झुराँग रोव्हरनं (Zhurong) पाठवलेले मंगळावरील भूभागाचे काही फोटो जारी केले आहेत. चीनची अंतराळ संशोधन संस्था सीएनएसएनं (CNSA) दोन सेल्फी प्रकारातील या फोटोसह तीन इतर फोटो शुक्रवारी जारी केले होते. या झुराँग रोव्हरनं जवळपास 10 मीटर अंतरावर रिमोट कॅमेरा लावून अनेक फोटो काढले आहेत. या फोटोमध्ये रोव्हरचा वरचा भाग तसंच तो प्लॅटफॉर्ममधून बाहेर निघण्याआधीचंही चित्र पाहायला मिळतं आहे. यानाच्या ऑर्बिटर आणि लँडर (orbiter and Lander) या दोन्हींवर चीनचा राष्ट्रध्वज असून, 2022 मध्ये होणाऱ्या बीजिंग ऑलिम्पिक्सची चिन्हंही याच्या बाह्यभागावर असलेली या फोटोत दिसून येत आहे.
चीनच्या मंगळ मोहिमेला मिळालेलं हे मोठं यश आहे. अमेरिकेनंतर मंगळावर रोव्हर उतरवणारा चीन हा दुसरा देश ठरला आहे. अमेरिकेसह रशियानंही मंगळावर रोव्हर उतरवण्याचा प्रयत्न केला आहे; मात्र आतापर्यंत फक्त अमेरिकेला यात यश मिळालं होतं. आता चीनचीही वर्णी लागली आहे.
हे ही वाचा-सी-स्नॉटमध्ये तुर्कीतील सागरी जीवन धोक्यात; अर्थिक घडामोडींवरही परिणाम
चीननं गेल्या महिन्यात हा रोव्हर घेऊन जाणारं तियानवेन-1 हे अंतराळ यान मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर उतरवलं होतं. याआधी हे यान जवळपास 3 महिने मंगळाच्या कक्षेत होतं. या रोव्हरवर असलेल्या आणखी 5 उपकरणांच्या मदतीने मंगळावरील दगडांचा अभ्यास (Study of stones on Mars) करता येणार असून जमिनीखाली कुठे पाणी वा बर्फ आहे का, याचाही शोध घेता येणार आहे. रोव्हरच्या शिडावर असलेल्या कॅमेऱ्याच्या मदतीने फोटो तर काढता येतातच; पण सोबतच रोव्हरला (Rover) या पृष्ठभागावर वावरतानाही याची मदत होते. सहा पायांचा हा रोव्हर मंगळावरील युटोपिया प्लानिशिया या भागाची पाहणी करत आहे. संरक्षणासाठीचं कवच (कॅप्सूल), पॅराशूट आणि रॉकेटचा वापर करून त्याचं या भागात यशस्वी लँडिंग करण्यात आलं. आतापर्यंत फक्त अमेरिकेनं अशा प्रकारे मंगळावर रोव्हर उतरवला होता. मंगळाच्या विषुववृत्ताच्या जवळच्या येझरो (Jezero) नावाच्या एका खोल विवरामध्ये 'पर्सव्हिअरन्स' रोव्हर उतरवण्यामध्ये अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाला यश मिळालं आहे. एखाद्या छोट्या हेलिकॉप्टरसारखा हा रोव्हर आता पुढची दोन वर्षं मंगळावरचे दगड आणि पृष्ठभाग खणत इथं जीवसृष्टी होती का, याचा शोध घेणार आहे.
अमेरिकेच्या ‘पर्सिव्हिअरन्स’ (Perseverance) या रोव्हरपेक्षा चीनचा झुराँग रोव्हरचं आकारानं लहान असून, याची उंची 1.85 मीटर आहे. या झुराँग रोव्हरचं वजन 240 किलो असून यावर सौरऊर्जेसाठी पॅनल लावण्यात आली आहेत. चीनच्या पुराणांमधल्या अग्नी आणि युद्ध देवतेच्या नावावरून या रोव्हरला झुराँग हे नाव देण्यात आलं आहे. या रोव्हरच्या मदतीनं चीनी संशोधक तिथल्या भूप्रदेशाचा मंगळावरचे 90 दिवस अभ्यास करतील. मंगळावरचा एक दिवस 24 तास आणि 39 मिनिटांचा असतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.