• Home
  • »
  • News
  • »
  • videsh
  • »
  • सी-स्नॉटमध्ये तुर्कीतील सागरी जीवन धोक्यात; अर्थिक घडामोडींवरही परिणाम, नेमकं काय आहे कारण

सी-स्नॉटमध्ये तुर्कीतील सागरी जीवन धोक्यात; अर्थिक घडामोडींवरही परिणाम, नेमकं काय आहे कारण

तुर्कीतील मार्मारा समुद्र (sea of Marmara) तुर्की आणि इस्तंबूलला तसेच युरोप आणि अशियाला विभक्त करतो. मात्र हा भाग सध्या सी-स्नॉट (Sea-Snot) या आपत्तीला तोंड देत आहे.

  • Share this:
तुर्कीतील मार्मारा समुद्र (sea of Marmara) तुर्की आणि इस्तंबूलला तसेच युरोप आणि अशियाला विभक्त करतो. मात्र हा भाग सध्या सी-स्नॉट (Sea-Snot) या आपत्तीला तोंड देत आहे. या समुद्रातील पाण्यावर सेंद्रीय पदार्थांचा (Organic Material) थर पसरल्यानं जलचर, पर्यावरण आणि येथील स्थानिक नागरिक त्रस्त आहेत. जागतिक तापमानवाढ (Global Warming) आणि वाढत्या प्रदुषणामुळे (Pollution) हे संकट उदभवल्याचे बोलले जात आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, बारीक हिरवा गाळ मोठ्या प्रमाणात साचल्याच्या पार्श्वभूमीवर तुर्कीने (Turkey) पाण्यातील नव्या इमारतींच्या बांधकामापासून आपले समुद्र किनारे वाचवण्यासाठी वचनबध्द असल्याचे सांगितले आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष तैय्यप एर्दोगन म्हणाले की या थराच्या आपत्तीपासून आम्ही या समुद्र किनाऱ्यांचे संरक्षण करु. काळा समुद्र (Black Sea) आणि ग्रीसचा एजियन समुद्र (Aegean Sea) जो मार्मारा समुद्राने जोडला आहे, तेथे देखील ही गाळाची समस्या दिसून येत आहे. त्यामुळे आता सरकारने तुर्कीच्या सागरी परिसंस्थेला धोका निर्माण करणाऱ्या या संकटाचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहिम सुरु केली आहे. हे ही वाचा-अवघ्या एक डॉलरमध्ये मिळणाऱ्या इटलीतील सुंदर घरांचं 'हे' आहे वास्तव याकडे अधिक लक्ष्य का दिले जात आहे? मार्मारा समुद्र हा काळा समुद्र आणि एजियन समुद्राला जोडतो. या प्रदेशासाठी हा महत्वाचा व्यापार मार्ग (Trade Route) आहे. सध्या या मार्गावरुन जाणाऱ्या बोटींना या दाट गाळाचा सामना करावा लागत आहे. जर हा गाळ काळ्या समुद्रात मोठ्या प्रमाणावर पसरला तर त्यामुळे जागतिक समस्या निर्माण होऊ शकते. राष्ट्रध्यक्ष एर्दोगन म्हणाले की याचा काळ्या समुद्रातही विस्तार झाला तर मोठा त्रास निर्माण होण्याची भिती आहे. त्यामुळे अधिक उशीर न करता आम्हाला पावले उचलावी लागणार आहेत. मारमारा समुद्र हा या प्रदेशातील अर्थव्यवस्थेचा प्रमुख घटक आणि स्त्रोत आहे. ज्यात इंस्तबूल सारख्या मोठ्या महानगरांचाही समावेश आहे. वाढत्या सी-स्नॉटमुळे सागरी जीवन आणि मासेमारी उद्योगाला धोका निर्माण होऊ शकतो. या गाळात जाळे अडकून बसत असून ते मासे दिसताच हे जाळे ओढताना खूप त्रास सहन करावा लागतो, अशी तक्रार स्थानिक मच्छिमारांनी केली आहे. या समस्येमुळे सागरी परिसंस्था (aquatic ecosystem) देखील अडचणीत आली आहे. माशांच्या विविध प्रजाती या गाळामुळे मृत्यूमुखी पडत असल्याचे एका अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. तुर्की मरीन रिसर्चचे प्राध्यापक बायराम ओझटर्क यांनी बीबीसीला सांगितले की श्लेष्माच्या वाढत्या प्रमाणामुळे ऑईस्टर, शिंपले, समुद्री तारे यासह अनेक प्रजाती (Sea Species) धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे ही खरोखरच आपत्ती आहे. हा सेंद्रीय पदार्थांचा थर ( Mucilage ) जवळपास 80 ते 100 फुटांपर्यंत पसरला आहे. हा जर समुद्राच्या तळाशी पसरला तर ते या प्रदेशातील सागरी पर्यावरणासाठी अधिक हानिकारक आहे. सी-स्नॉटमुळे मासे तसेच अन्य सागरी प्रजातींना विषबाधा होण्याची शक्यता अधिक असून, ही परिस्थिती कोणत्याही क्षणी उदभवू शकते. दरम्यान, प्रदुषणाच्या संभाव्य स्त्रोतांची तपासणी करण्यासाठी सरकारने 300 सदस्यांचे पथक गठित केले आहे. सी-स्नॉट म्हणजे काय? ते कसे निर्माण होते? सी-स्नॉट हा एक घट्ट, जाडसर राखाडी-तपकिरी थर असतो. हा मरीन म्युसिलेज म्हणून ओळखला जातो. याची निर्मिती मृत अथवा जिवंत सेंद्रीय पदार्थांपासून होते. हवामान बदलामुळे उष्ण हवामानात शैवाल या एकपेशीय  वनस्पतींमध्ये पोषक पदार्थांचा अतिरेक होतो आणि त्याचे रूपांतर गाळात होते. शैवाल ही वनस्पती जलचरांमध्ये ऑक्सिजनची पातळी टिकवून ठेवण्यासाठी मुख्य स्त्रोत आहे. जर त्यांच्या वाढीकडे दुर्लक्ष केले गेले तर ते खोल पाण्यात पसरुन सूर्यप्रकाश मिळण्यात अडथळा निर्माण करतात. तुर्कीमध्ये 2007 मध्ये पहिल्यांदा सी-स्नॉटची समस्या आढळून आली होती. परंतु, सध्या याचा झालेला उद्रेक हा इतिहासातील सर्वात मोठा उद्रेक मानला जात आहे. हा उद्रेक मोठ्या प्रमाणात होण्याची कारणे शोधली जात असली तरी त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे नायट्रोजन आणि फॉस्फरससारख्या सेंद्रिय संयुगांचे प्रदुषण होय. पाण्याचे वाढते तापमान हा घटक देखील यात महत्वाची भूमिका बजावतो. METUs च्या मेरीटाईम सायन्सेसचे प्रमुख बारिस सालिहोग्लू यांनी DW ला सांगितले की गेल्या 20 वर्षांत मार्मारा समुद्रातील पाण्याचे तापमान जागतिक सरासरीच्या तुलनेत सरासरीपेक्षा 2 ते 2.5 अंश सेल्सिअसने वाढले आहे. या समुद्राभोवती 20 दशलक्ष लोकसंख्येचे वास्तव्य आहे. त्यामुळे या प्रदेशात मोठ्या प्रमाणात मासेमारी होत असून पाण्यातील जैवविविधतेचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी अशा प्रादुर्भावांचा धोका वाढला आहे.  
Published by:Meenal Gangurde
First published: