पुणे, 16 जून: छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रासाठी केवळ एक राजे नाहीत, तर ती एक भावना आहे. महाराष्ट्राला शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहासाचा वारसा लाभला आहे. पण काळाच्या ओघात शिवाजी महाराजांचे अनेक समकालीन चित्र नष्ट (Shivaji maharaj paintings) झाले आहेत. पण अलीकडेच तीन वेगवेगळ्या देशातील संग्रहालयात महाराजांचे तीन दुर्मिळ चित्र (Rare paintings) आढळले आहे. महाराजांचे तिन्ही चित्र ऐतिहासिक, पुरातन, दुर्मीळ आहेत. हे फोटो फ्रान्स जर्मनी आणि अमेरिकेतील संग्रहालयात आढळले आहे.
याबाबतची माहिती देताना इतिहास अभ्यासक प्रसाद तारे यांनी सांगितलं की, हे तिन्ही चित्र गोवळकोंडा शैलीतील असून सतराव्या शतकातील रेखाटली असल्याचं सांगितलं जात आहे. यातील दोन चित्रांवर पर्शियन आणि एका चित्रावर रोमन लिपीत महाराजांचं नाव लिहिलं आहे. या चित्रांमध्ये महाराजांच्या डौलदार पेहरावात दिसत असून महाराजांच्या तत्कालीन वर्णनात आढळणारी वैशिष्ट्यं चित्रात उतरली आहेत.
यातील पहिलं चित्र हे जर्मनीतील स्टेट आर्ट वस्तुसंग्रहालयातील आढळलं असून यामध्ये केशरी म्यानातील सरळ पात्याची तलवार महाराजांच्या हातात दाखवली आहे. तर दुसरं चित्र पॅरिसच्या एका खाजगी वस्तुसंग्रहालयात आढळलं आहे. त्यात महाराजांच्या हातात पट्टा हे शस्त्र आहे. संग्रहालयातील नोंदीनुसार डाव्या हातात मोरपिसाप्रमाणे कोणत्या तरी पक्ष्याचं शोभेचं पीस आहे. तर तिसरं चित्रं अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील संग्रहालयातील आहे. चित्रात महाराजांच्या हातात पट्टा हे शस्त्र असून कमरेला कट्यार लावली आहे. युरोपतून हे चित्र पुढं अमेरिकेत हस्तांतरित करण्यात आलं आहे.
हे ही वाचा- 50 हजार दिवे, ठाण्यात उभारले शिवरायाचे जगातील सर्वात मोठे मोझॅक पोट्रेट!
खरंतर हे सर्व चित्र गोवळकोंडा शैलीतील आहे. गोवळकोंडा ही कुतुबशहाची राजधानी होती. तेथील ही एक प्रचलित चित्रशैली आहे, त्यामुळे याला गोवळकोंडा चित्रशैली म्हणतात. महाराज दक्षिण भारताच्या मोहिमेवर असताना ही चित्रे काढलेली असावीत किंवा त्यावेळी काढलेल्या त्यांच्या अन्य चित्रांच्या आधारे सतराव्या शतकार्यंत ही चित्रं रेखाटली असावीत, असा अंदाज इतिहासकारांनी वर्तवला आहे. या सर्व चित्र नैसर्गिक जलरंग आणि सोन्याचा वापर करून काढण्यात आली आहेत. त्यामुळे याचं ऐतिहासिक मूल्य अधिक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.