इस्लामाबाद 08 मे : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी भारतीयांचं कौतुक करताच पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला आहे. पाकिस्तानी विशेषतः परराष्ट्र सेवेशी संबंधित अधिकाऱ्यांना इम्रान खानचं हे विधान अजिबातच पटलेलं नाही. यामुळे त्यांनी पंतप्रधानांच्या विरोधातच आवाज उठवला आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आपल्या दूतावासांना फटकारत भारतीय दूतावासांकडून (Indian Embassies) शिकण्याचा सल्ला दिला होता. ते म्हणाले होते, की भारतीय दूतावास अत्यंत चांगलं काम करत आहे. त्यांनी भारताचं केलेलं हेच कौतुक पाकिस्तानींना अजिबात आवडलेलं नाही.
इम्रान खान यांच्या या विधानावर किमान तीन माजी विदेश सचिवांनी टीका केली आहे. पाकिस्तानच्या इतिहासातील पहिली महिला परराष्ट्र सचिव असलेल्या तहमिना जंजुआ (Tehmina Janjua) यांनी यासंदर्भात ट्विट केलं. यात त्यांनी म्हटलं की, 'परराष्ट्र मंत्रालयाबाबत केलेल्या या टीकेमुळे मी खूप निराश आहे. पंतप्रधानांच्या या वक्तव्यातून त्यांना परराष्ट्र सेवेबद्दल असलेली कमी समज दिसून येते. याशिवाय माजी परराष्ट्र सचिव सलमान बशीरसुद्धा पाकिस्तानच्या परराष्ट्र सेवेच्या बाजूनं पुढे आले आहेत.
सलमान बशीर यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, 'मान्यवर, परराष्ट्र मंत्रालय आणि राजदूत यांच्याविषयी तुमची नाराजी आणि टीका योग्य नाही. ते पुढे म्हणाले की, पाकिस्तान परराष्ट्र सेवा आणि परराष्ट्र कार्यालयाने ते सगळं काम केलं, जे त्यांनी करायला हवं होतं आणि ते प्रोत्साहन व पाठिंब्यास पात्र आहेत.
बशीर खरंतर खान यांनी भारतीयांचं कौतुक केल्यामुळे नाराज आहेत. ते म्हणाले, की भारतीय मीडिया पंतप्रधानांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयची केलेली निंदा आणि भारतीयांच्या केलेल्या प्रशंसेमुळे आनंदी आहे.
आणखी एक माजी परराष्ट्र सचिव जलील अब्बास जिलानी यांनीही खान यांचे विधान चुकीचे असल्याचे सांगत ते फेटाळून लावले. ते म्हणाले, 'माननीय पंतप्रधान, मी आशा करतो की तुम्हाला मिशनच्या कामकाजाविषयी योग्य माहिती दिली जाईल. सरकारकडून वेळेत उत्तर न मिळाल्याने अनेक कामांना विलंब होत आहे. यासाठी राजदूतांना जबाबदार धरणे चुकीचे आहे.
इमरान खाननं काय म्हटलं होतं -
आपल्या दूतावासाच्या कर्मचार्यांविषयी तक्रारी येत असल्यानं तीव्र नाराजी व्यक्त करत इम्रान खान म्हणाले होते, की राजदूतांनी वसाहतवादी काळातील मानसिकता सोडून पाकिस्तानी वंशाच्या लोकांशी पूर्ण सहानुभूतीने वागले पाहिजे आणि परकीय गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यांनी भारतीय दूतावासांचे कौतुक केले होते आणि म्हटले होते की जगभरात परदेशी गुंतवणूक आणण्यात भारतीय दूतावास खूप सक्रिय आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pak pm Imran Khan, Pakistan