नवी दिल्ली, 10 मार्च: पाकिस्तानमध्ये (Pakistan) महागाईनं उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता संतप्त झाली आहे. जीवनावश्यक वस्तूच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. अशामध्ये पाकिस्तानची आर्थिक स्थिती देखील ढासळली असल्याची माहिती समोर येत आहे. महागाई वाढीवरुन त्रस्त झालेली जनता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांच्यावर जोरदार टीका करत आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल (viral video) होत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून इम्रान खान यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे, एबीपी लाइव्ह वेबसाइटने ही बातमी दिली आहे. संगीतकार साद अल्वी (Musician Saad Alavi) यांचा हा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या ट्विटरवर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. देशाला संबोधित करताना पंतप्रधान इम्रान खान ‘आपको घबराना नही है’ असं म्हणाले होते. त्यांच्या या वाक्यावरुनच हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. या व्हिडिओद्वारे गायकाने पाकिस्तानमध्ये सध्या असलेल्या महागाईच्या स्थितीचा उल्लेख करुन जनतेवर काय वेळ आली आहे यावर भाष्य करत हे विडंबनात्मक गाणं तयार केलं आहे. गव्हाचं पीठ महाग झालं तर जेऊ नका, साबण महाग झाला तर तो वापरणं सोडून द्या पण घाबरू नका अशा या गाण्याच्या ओळी आहेत. गाण्याच्या ध्रुवपदाच्या जागी इम्रान यांच्याच व्हिडिओतलं ‘आपने घबराना नही’ हे वापरलं आहे त्यामुळे गाणं आणखी मजेदार झालं आहे.
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत आपली मतं नोंदवली आहेत. काहींनी या व्हिडिओचे कौतुक करत अगदी बरोबर असल्याचं म्हटलं आहे. एका युजरनं असं म्हटलं आहे की, ‘इम्रान खान कदाचित प्रत्येक बाबतीत अपयशी ठरले असतील. पण त्यांचे सर्वात मोठं यश म्हणजे ते किमान लोकांचं मनोरंजन करण्याचा एक महान स्रोत झाले आहेत.’
Imran Khan may have failed in every aspect, but his biggest succes is that he has become a great source of entertainment atleast. https://t.co/85bScwYF6K
— Maj Ajay Rana (@MajAjayRana) March 9, 2021
हे वाचा - ‘हवं तर मला गोळी मारा, पण या लोकांना जाऊ द्या’; धगधगत्या म्यानमारमधला हृदय हेलावून टाकणारा VIDEO
इम्रान खान सरकारच्या कामगिरीवर चिंता आणि वाद कायम आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील सामान्य नागरिकांना स्वयंपाक करणं देखील कठीण झालं आहे. जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. याठिकाणी आलं, अंडी, कोंबड्या आणि मांसच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. सततच्या महागाईमुळं पाकिस्तानची जनता त्रस्त झाली असून हा इम्रान खान यांचा नवीन पाकिस्तान आहे का? अशी विचारणा केली जात आहे.