इस्लामाबाद, 6 एप्रिल : पाकिस्तानातील (Pakistan) राजकीय पेचप्रसंगात इम्रान खान (Imran Khan) यांना पंतप्रधानपद गमवावे लागले असून आता ते निवडणुकीत जनतेची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. अविश्वास ठराव फेटाळून त्यांनी आपली इज्जत वाचवली, पण हीच बाजी त्यांना जड जाऊ शकते. विरोधकांची एकजूट झाली असून, या निवडणुकीत इम्रान यांना सत्ता मिळाली नाही, तर त्यांना नक्कीच शिक्षा होईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. पाकिस्तानची नॅशनल असेंब्ली बरखास्त करण्यात आली आहे, त्यामुळे देशात 90 दिवसांत सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. निवडणुकीत विरोधकांचा विजय झाला तर इम्रान खान यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो.
विरोधकांनी अनेक आघाड्यांवर इम्रानला देशद्रोही म्हटले आहे. इम्रानची अवस्थाही जनरल परवेझ मुशर्रफ यांच्यासारखी होऊ शकते. एकेकाळी नवाझ शरीफ सरकारने मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता आणि न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. मुशर्रफ अजूनही पाकिस्तानपासून दूर दुबईत आहेत. पाकिस्तानमध्ये अनेक अफवा सुरू आहेत.
इम्रान खान यांचा दावा ठरला फोल! पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांना सापडला नाही 'तो' पुरावा
निवडणुकीच्या निकालावरच चित्र स्पष्ट होईल, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. इम्रान खान यांच्या पक्षाला बहुमत मिळू शकले नाही, तर विरोधक त्यांच्याकडून नक्कीच बदला घेतील. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे बंधू आणि आता विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांनी अविश्वास प्रस्ताव फेटाळून राज्यघटनेच्या विरोधात कृत्य केल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, इम्रान खान यांनी पाकिस्तान नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास प्रस्ताव फेटाळला होता आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांची भेट घेतली आणि देशात परकीय षड्यंत्राचा हवाला दिला. राष्ट्रपतींनी नॅशनल असेंब्ली बरखास्त करून देशात सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या होत्या.
परवेझ मुशर्रफ यांच्यासारखी परिस्थिती होण्याची शक्यता
इम्रान खान यांची अवस्था मुशर्रफ यांच्यासारखी होऊ शकते, अशी भीती राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 1999 मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ सरकार उलथून टाकले. नवाझ शरीफ यांना आधी नजरकैदेत ठेवण्यात आले आणि नंतर तुरुंगात टाकण्यात आले. मुशर्रफ पाकिस्तानचे अध्यक्ष झाले आणि ऑगस्ट 2008 पर्यंत या पदावर राहिले. मुशर्रफ यांना राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यापासून रोखण्यासाठी विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर मुशर्रफ यांनी देशात आणीबाणी लागू केली होती.
काही काळानंतर त्यांना निवडणुका घ्याव्या लागल्या, त्यानंतर पीपीपीची सत्ता आली. परिणामी मुशर्रफ यांना पायउतार व्हावं लागलं. 2013 च्या उत्तरार्धात पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (PML-N) सत्तेत आल्यावर नवाझ शरीफ पंतप्रधान झाले. त्यांनी मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. त्याचदरम्यान मुशर्रफ उपचारासाठी, दुबईला गेले ते परत आलेच नाही. खटला चालू राहिला आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, ज्याला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.