• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • कतारमध्ये भारताची तालिबानसोबत औपचारिक चर्चा, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे

कतारमध्ये भारताची तालिबानसोबत औपचारिक चर्चा, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे

भारत (India) आणि तालिबानच्या (Taliban) प्रतिनिधींमध्ये कतारची (Qutar) राजधानी दोहा (Doha) या ठिकाणी औपचारिक चर्चा पार पडली.

 • Share this:
  दोहा, 31 ऑगस्ट : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानची (Taliban) सत्ता आल्यानंतर आता आशियातील (Asia) राजकीय समीकरणं बदलायला सुरुवात झाली आहे. अमेरिकेनं अफगाणिस्तानातून माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार येणार, हे स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर भारत (India) आणि तालिबानच्या (Taliban) प्रतिनिधींमध्ये कतारची (Qutar) राजधानी दोहा (Doha) या ठिकाणी औपचारिक चर्चा पार पडली. भारताच्या वतीनं राजदूत दीपक मित्तल यांनी तालिबानच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत भारताने आपले मुद्दे स्पष्टपणे तालिबानसमोर मांडले. अफगाणिस्तानच्या भूमीचा उपयोग भारताविरुद्धच्या कारवाईसाठी करण्यात येऊ नये, अशी अपेक्षा भारताने तालिबानकडे व्यक्त केली. त्याचप्रमाणे अफगाणिस्तानमध्ये अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि त्यांच्या सुरक्षित परतीच्या मुद्द्यावरदेखील या बैठकीत चर्चा करण्यात आली. काय होती भारताची भूमिका अफगाणिस्तान हा भारताचा शेजारी देश असल्याने अफगाणिस्तानमध्ये होणाऱ्या राजकीय घडामोडींचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम भारतावरही होणार आहे. त्याचप्रमाणे अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर भारतविरोधी कारवाया करण्यासाठी शेजारी देशांकडून केला जाण्याची शक्यता आहे. मात्र आपल्या देशातील भूमीचा अशा कामांसाठी वापर करू न देण्याचं स्पष्ट आश्वासन तालिबानने द्यावं, अशी मागणी भारताच्या वतीने करण्यात आली. अफगाणिस्तानातून आतापर्यंत 800 पेक्षा अधिक नागरिकांना भारतात सुरक्षितरित्या आणण्यात आलं आहे. मात्र अद्यापही काही भारतीय नागरिक अफगाणिस्तानात अडकून पडले आहेत. त्याचप्रमाणे काही शिख आणि हिंदू अफगाणी नागरिकांनी भारताकडे आश्रय मागितला आहे. या सर्वांच्या सुरक्षित परतीच्या प्रवासाबाबतही या बैठकीत चर्चा झाली. तालिबानचा प्रतिसाद तालिबानने भारताच्या मागण्यांचा सकारात्मक पद्धतीने विचार केला जाईल, असं तालिबानच्या वतीने सांगण्यात आलं आहे. भारत सरकारच्या वतीनं दोहामध्ये मांडण्यात आलेली भूमिका अफगाणिस्तानमधील आगामी सरकारपुढे मांडण्यात येईल आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्यात येईल, असं आश्वासन तालिबानच्या प्रतिनिधींकडून भारताला देण्यात आलं.
  Published by:desk news
  First published: