मीना हॅरीसचे नाव नेहमी चर्चेमध्ये असते. जेव्हापासून तिची मावशी कमला हॅरीस अमेरिकेच्या उपाध्यक्षा झाल्या आहेत तेव्हापासून मीना जास्तच चर्चेमध्ये आहे. कधी कमला हॅरीस यांच्या रॅलीमध्ये सहभागी झाल्यामुळे, कधी भारतातील शेतकरी आंदोलनाला (Farmers Agitation) पाठिंबा दिल्यामुळे, तर कधी कमला हॅरीस ब्रँडचा वापर केल्यामुळे मीना हॅरीस चर्चेत राहिली आहे. सध्याच्या बातमीनुसार, 'आपल्या प्रतिमेसाठी अमेरिकेच्या उपाध्यक्षांच्या ब्रँडचा वापर करू नको.', असा इशारा व्हाइट हाऊसने मीनाला दिला आहे. (Image: Twitter)
मीना आपल्या मावशीमुळेच ओळखली जाते असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मीनाला व्यवस्थित ओळखले नाही. मीनाचा व्यवसाय, कौशल्य आणि मनोरंजक तथ्य जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला तिचे वैयक्तिक आयुष्य कसे आहे हे जाणून घेतले पाहिजे. 36 वर्षीय मीना कमला हॅरीस यांची धाकटी बहीण मायाची मुलगी आहे. माया किशोरवयामध्येच लग्न न करताच आई झाल्या होत्या. त्यामुळे माया आणि मीना त्यावेळी कमला हॅरीस आणि त्यांची आई श्यामला हॅरीस यांच्यासोबतच राहायच्या.
कमला हॅरीस यांच्यासोबत मोठ्या झालेल्या मीनावर मावशीचा चांगलाच प्रभाव आहे. एवढेच नाही तर त्यांचे उपक्रम तयार करणात आणि वाढविण्यामध्ये मीनाचे खूप मोठे योगदान आहे. वेळेनुसार मीनाने फक्त आपली आवड आणि स्वत:ची ओळख निर्माण केली नाही तर स्वत:चा ब्रँड देखील तयार केला. त्यामुळे सध्या मीना हॅरीस आपल्या मावशीच्या नावाव्यतिरिक्त देखील ओळखली जाते.
आपली आई आणि मावशीप्रमाणेच मीनाने देखील कायद्याचा अभ्यास केला असून यातच करिअर करण्याची तिची इच्छा आहे. पण पदवी आणि काही नामांकित कंपन्यांच्या कायदेशीर विभागात काम केल्यानंतर मीनाला हे समजले की, हे पारंपरिक करिअर आपला मार्ग नाही. त्यानंतर मीनाने महिला सक्षमीकरणासाठी फिनॉमिनल वूमन कँपेन सुरु केले. याबाबत मीनाने आधीच सांगितले की, 'आपल्या आवडीला फॉलो करत समाजात योगदान देण्यासाठी माझ्या मावशीने मला नेहमी प्रेरणा आणि शक्ती दिली.'
महिलांच्या संस्थेची संस्थापक होण्यासोबतच मीनाची ओळख चिल्ड्रेन बुक राइटर म्हणून देखील आहे. मीनाने आतापर्यंत मुलांसाठी दोन बेस्ट सेलिंग पुस्तकं लिहिली आहेत. या पुस्तकामध्ये मीनाने आपली आई आणि मावशीचे मुलांसाठी एक प्रेरणादायक कॅरेक्टर तयार केले आणि 'माया अॅण्ड कमला बिग आइडिया' या नावाने दोन बहिणींची खरी कथा मुलांसमोर सादर केली. एंबिशियस गर्ल (Ambitious Girl) हे तिचे दुसरे पुस्तक आहे. जे यावर्षी जानेवारी महिन्यात प्रकाशित झाले असून त्याची देखील खूप चर्चा झाली.
कमी वयामध्ये आई झालेल्या माया जेव्हा स्टॅनफोर्ड लॉ स्कूलमध्ये दाखल झाल्या तेव्हा 4 वर्षांच्या मीनाने माया यांचा वर्गमित्र टोनी वेस्टला लपाछुपी खेळायला भाग पाडले. त्याचवेळी माया आणि टोनी पहिल्यांदा जवळ आले. काही वर्षांनंतर दोघांनी लग्न केले. दरम्यान, मीना दोन मुलांची आई आहे आणि आपल्या मुलांच्या चांगल्या संगोपणासाठी तिने लेखन आणि महिला सबलीकरणाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.